२०२४ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पूर्ण करण्याचा ‘एमएमआरडीए’चा संकल्प


मुंबई : २०२४ पर्यंत दादरमधील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा संकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केला आहे. स्मारकाच्या पायाभरणीचे काम नुकतेच पूर्ण झाले असून आता पुढील कामाला सुरुवात झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक इंदू मिल येथे १२ एकर जागेत उभारण्याची जबाबदारी एमएमआरडीवर सोपविण्यात आली आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ४५० फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. विहार, ध्यानधारणा केंद्र, ग्रंथालय, माहिती केंद्र, सभागृह, वाहनतळ आणि अन्य सुविधांचा उपलब्ध करण्यात येणार आहेत. या कामासाठी एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एमएमआरडीएने त्यानुसार स्मारकाचा आराखडा तयार करून काम सुरू करण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर स्मारकाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू असून २०२४ पर्यंत स्मारक पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएमआरडीएने निश्चित केले आहे.

स्मारकाच्या कामाचा नुकताच महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी आढावा घेतला, तर कामाची गती आणखी वाढविण्याच्या दृष्टीने काही सूचना देखील केल्या आहेत. आतापर्यंत पायाभरणीचे सर्व काम पूर्ण झाले आहे. आता पुढील कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती श्रीनिवास यांनी दिली. तसेच स्मारकाचे काम २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

२०१२-१३मध्ये डॉ. आंबेडकर स्मारकाचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी स्मारकाचा अंदाजित खर्च ४२५ कोटी रुपये होता. विविध कारणांमुळे खर्चात वाढ होत गेली. २०१७ मध्ये स्मारकाचा खर्च ७०९ कोटी रुपयांवर पोहोचला. आता हा खर्च थेट एक हजार कोटी रुपयांवर गेला आहे. त्यानुसार नुकतीच एमएमआरडीएने या निधीला मान्यता दिली.