आणखी एका शेतकऱ्याचा सिंघू बॉर्डरवर मृत्यू; मृत शेतकऱ्याच्या डाव्या हातावर फक्त होता ‘जिम्मेदार’ हा शब्द


नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन अद्याप सुरूच आहे. दरम्यान, सिंघू सीमेवर निदर्शनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याचा मृतदेह बुधवारी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यामुळे तेथे खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत शेतकऱ्याचे नाव गुरप्रीत सिंग असे आहे. तो पंजाबच्या फतेहगढ साहिबच्या अमरोह तहसीलमधील रुरकी गावचा रहिवासी होता.

बीकेयू सिद्धपूरशी गुरप्रीत सिंह संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. ही हत्या की आत्महत्या हे अद्याप समजू शकलेले नाही. दोन्ही बाजूंनी कुंडली पोलीस ठाणे तपास करत आहेत. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

याबाबत माहिती देताना सोनीपत येथील कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उप अधीक्षक वीरेंद्र सिंग म्हणाले, प्राथमिक माहितीनुसार ही आत्महत्या असल्याचे दिसते. चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान बीकेयू एकता सिद्धुपूरच्या गुरजिंदर सिंग यांनी सांगितले की, सकाळी सहाच्या सुमारास घटनेची माहिती त्यांना मिळाली आणि त्यांनी गुरप्रीत सिंगला रुग्णालयात नेले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

गुरप्रीत सिंग सोमवारी गावाला भेट देऊन सिंघू सीमेवर परतला होता. गेल्या दोन दिवसांत शेतकऱ्यांशी साधलेल्या संवादात गुरप्रीत सिंगने कृषी कायद्यांवरील अडथळ्यामुळे नाराज असल्याचा उल्लेख केला आणि एक वर्षाहून अधिक काळ शेतकरी आंदोलने करूनही सरकार त्यांच्या मागण्या ऐकून घेत नसल्याचे म्हटले. मृत्यूपूर्वी गुरप्रीत सिंगने कोणतीही चिठ्ठी लिहिलेली नाही. त्याच्या डाव्या हातावर फक्त ‘जिम्मेदार’ हा शब्द लिहिलेला असल्याचे सिंग यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, गुरप्रीत सिंगच्या पश्चात त्याची पत्नी आणि एक २० वर्षांचा मुलगा आहे.