कवितेच्या माध्यमातून अमृता फडणवीसांची नवाब मलिक यांच्यावर टीका


मुंबई – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपच्या अनेक नेत्यांचा ड्रग्ज क्षेत्रातील लोकांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. राज्यातील ड्रग्ज उद्योगाचे देवेंद्र फडणवीस हे मास्टर माइंड असल्याचा धक्कादायक आरोपही नवाब मलिक यांनी केला होता. तसेच अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या जयदीप राणाचा फोटो मलिक यांनी ट्विटवरुन पोस्ट केला होता. जयदीप राणा ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. अमृता फडणवीसांवर नवाब मलिक यांनी अप्रत्यक्षपणे केलेल्या आरोपांनतर त्या चांगल्याच भडकल्या आहेत.


ट्विटद्वारे पुन्हा एकदा राज्यातील मंत्री नवाब मलिक यांच्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कवितेच्या माध्यमातून जोरदार हल्ला चढवला आहे. नवाब मलिकांना काळा पैसा वाचवायचा असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. बिघडलेल्या नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेवर पत्रकार परिषद घेतली. पण प्रत्येक वेळी ते फक्त खोटे बोलले. त्यांचे ध्येय एकच आहे, त्यांना त्यांचा जावई आणि काळा पैसा वाचवायचा असल्याचे अमृता फडणवीसांनी म्हटले आहे.

अमृता फडणवीसांनी याआधी नवाब मलिकांवर हल्लाबोल करताना पुरुष असाल तर माझ्यामार्फत देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करू नका, असे म्हटले होते. नवाब मलिकांनी जयदीप राणासोबत फोटो ट्विट केल्यानंतर अमृता फडणवीसांनी टीका केली होती. मी परत एकदा सागंते माझ्यावर तुम्ही जे आरोप करत आहात आणि माझ्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर, आम्ही स्वतंत्र व्यक्ती आहोत, आमची वेगळी ओळख आहे. मी सामाजिक कार्यकर्ती, बँकर आणि गायिका आहे. मी माझी ही ओळख जपली आहे. जर माझ्या अंगावर कुणी आले, तर मी त्याला सोडणार नाही. कारण, मी खऱ्याची साथ सोडत नाही आणि खोट्याची साथ देणाऱ्याला देखील सोडत नाही. हे सगळे जाणीवपूर्वक केले जात आहे, आमच्याकडे असे काहीच नाही जे ते उघड करू शकतात. आमच्याकडे भूखंड, साखर कारखाने असे काहीच नाही, आम्ही कोणाला घाबरत नसल्याचे अमृता फडणवीसांनी म्हटले होते.