‘या’ महिन्यात विवाहबद्ध होणार आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ?


बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. पण त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. तसेच याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. आलिया आणि रणबीर हे दोघेही नुकतेच दिवाळीच्या मुहूर्तावर एकत्र एका पूजेच्या मंडपात दिसले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाच्या विविध चर्चांना उधाण आले होते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये आलिया आणि रणबीर विवाहबंधनात अडकणार होते. पण हे लग्न त्यांनी काही कारणात्सव पुढे ढकलले आहे. येत्या डिसेंबरमध्ये आलिया-रणबीर हे लग्न करु शकतात, असे बोलले जात आहे. पण त्यांच्या लग्नाबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर दुसरीकडे डिसेंबरमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्न करणार असल्याची चर्चा आहे. पण या वृतालाही अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही.

रणबीर कपूरने गेल्यावर्षी दिलेल्या एका मुलाखतीत त्याने लग्नाबद्दल भाष्य केले होते. तो त्यावेळी म्हणाला होता की, जर कोरोनाची लाट आली नसती, तर आलियाशी मी २०२० मध्येच लग्न केले असते. मलाही लग्नाची तारीख लवकरच निश्चित करायची असल्याचे त्याने सांगितले होते. दरम्यान ते दोघेही यानंतर येत्या डिसेंबरमध्ये लग्न करू शकतात, अशा चर्चा सुरु होत्या. पण ही जोडी आता पुढील वर्षी एप्रिलमध्ये लग्न करणार असल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे. लग्न पुढे ढकलण्यामागे आलिया आणि रणबीर यांच्या वर्क कमिटमेंट असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते दोघेही त्यांच्या आगामी चित्रपटांचे शूटिंग संपवून लवकरच लग्न करतील, असे सांगितले जात आहे.

आलिया आणि रणबीरला कोणतीही घाई न करता लग्न करायचे आहे. त्यांच्या कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, कपूर कुटुंब हे खूप मोठे असल्यामुळे त्यांना थाटामाटात लग्न करायचे आहे. सध्या त्यांच्या कृष्णा राज या बंगल्याचे नूतनीकरण सुरू आहे. तर दुसरीकडे कोरोनाची भीती पूर्णपणे नाहीशी झालेली नसल्यामुळे या कुटुंबाला अजून थोडा वेळ घ्यायचा आहे. त्यामुळे आता कपूर कुटुंब आलिया-रणबीरच्या लग्नाची अंतिम तारीख कधी जाहीर करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.