असा आहे सेन्ट्रल, टर्मिनल आणि जंक्शन स्टेशन मधला फरक

भारतीय रेल्वे जगातील चार नंबरचे मोठे नेटवर्क आहे. भारतीय रेल्वे, प्रवाशांना नुसत्या त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवते असे नाही तर प्रवासात भारताचे सौंदर्य, विविधता, एकता यांचेही दर्शन घडविते. भारतीय रेल्वे ही भारतीयांची लाईफ लाईन आहे असे म्हटले तरी गैर होणार नाही. देशभर रेल्वेची हजारो स्टेशन आहेत आणि त्यांची विविध नावे आहेत. मात्र काही स्टेशन जंक्शन आहेत काही सेन्ट्रल आहेत तर काही टर्मिनल आहेत. यात नक्की काय फरक आहे याची मात्र अनेकांना माहिती नाही.

भारतीय रेल्वेचा वापर दररोज लाखो प्रवासी करतात. या प्रवासात त्यांना वरील प्रकारची विशेष स्टेशन्स लागतात. छत्रपती शिवाजी टर्मिनल, हावडा टर्मिनल ही देशातील मोठी टर्मिनल स्टेशन्स आहेत. टर्मिनल याचा अर्थ त्या रेल्वे लाईनवरील ते शेवटचे स्टेशन. म्हणजे त्याच्या पुढे ट्रेन जात नाही. टर्मिनेशन पासून टर्मिनल हा शब्द आला आहे. येथे रेल्वे जाण्याचा आणि येण्याचा एकच मार्ग असतो.

जंक्शन म्हणजे ज्या स्टेशनवर किमान तीन रेल्वे मार्ग जोडले जातात अशी स्टेशन. येथे वेगवेगळे रेल्वे मार्ग एकमेकांना जोडलेले असतात. येथे येणाऱ्या ट्रेन साठी किमान दोन लाईन्स असतात. मथुरा जंक्शनवर सात लाईन्स असून विजयवाडा, बरेली ही देशातील मोठी जंक्शन आहेत.

सेन्ट्रल स्टेशन म्हणजे त्या शहरातील सर्वात मोठे स्टेशन. ज्या शहरातून एकापेक्षा अधिक रेल्वे स्टेशन असतात त्यातील सर्वात मोठे स्टेशन म्हणजे सेन्ट्रल स्टेशन. ही स्टेशन अतिशय वर्दळीची असतात आणि येथे अनेक ट्रेन जा ये करतात. भारतात अशी अनेक सेन्ट्रल स्टेशन आहेत. त्यात मुंबई सेन्ट्रल, कानपूर आणि चेन्नई ही प्रमुख आहेत. राजधानी दिल्लीचे रेवे स्टेशन मात्र जंक्शन आहे.