लग्न सिझनसाठी भारतीय व्यापारी तयारीत

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजे कॅटने आगामी लग्नसराई साठीचा अंदाज व्यक्त केला असून येत्या १४ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या महिन्याभराच्या काळात देशात किमान २५ लाख विवाह होणार असल्याचे आणि त्यातून ३ लाख कोटीच्या व्यवसाय होणार असल्याचे संकेत दिले आहेत. एकट्या दिल्लीत या काळात दीड लाख विवाह होणार आहेत आणि त्यातून किमान ५० हजार कोटींची उलाढाल होणार आहे असाही अंदाज व्यक्त केला गेला आहे. यंदाच्या दिवाळीत व्यापारी, व्यावसायिकांनी चांगला व्यवसाय केला असल्याने व्यापारी खुश आहेत आणि हे क्षेत्र आता लग्नसिझनच्या तयारीत मश्गुल आहे. १४ नोव्हेंबर रोजी तुलसी विवाह आहे आणि तेव्हापासून देशात विवाह सिझन सुरु होत आहे.

कॅटच्या आध्यात्मिक आणि वैदिक ज्ञान कमिटीचे अध्यक्ष दुर्गेश तारे यांच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये लग्नाचे अनेक चांगले मुहूर्त आहेत. त्यानंतर १४ जानेवारी नंतर पुन्हा मुहूर्त आहेत. कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भरतिया म्हणाले देशाच्या सर्व भागातील व्यापारी या सिझनसाठी सज्ज आहेत. प्रत्येक विवाहात २० टक्के खर्च वधू पक्षाकडून तर ८० टक्के खर्च या कामी सहाय्य करणाऱ्या तिसऱ्या एजन्सी कडून होत असतो. एक लग्न म्हटले तरी अनेक क्षेत्रातील व्यावसायिकांना काम मिळते. घर रंगविणे, पेंटिंग, डाग दागिने, कपडे खरेदी, पादत्राणे, लग्न पत्रिका, ड्रायफ्रुट, मिठाया, फळे, पूजा समान, किराणा, डेकोरेशन, इलेक्ट्रिक समान, गिफ्ट्स यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते.

याचबरोबर हॉल, मंगल कार्यालये, हॉटेल्स, लॉन्स, फार्म हाउसेस, तंबू, फुले, क्रोकरी, केटरिंग, ट्रॅव्हल, कॅब, स्वागत समारंभ प्रोफेशनल, भाजीवाले, फोटोग्राफर, व्हिडीओ, बँड, ऑर्केस्ट्रा, घोडे, बग्गी, लाईट अश्या व्यावसायिकांना मोठी मागणी असते. कॅगच्या अंदाजानुसार या एक महिन्यात होणाऱ्या २५ लाख लग्नात ५ लाख लग्नात किमान दोन लाख खर्च. पाच लाख विवाहात किमान ५ लाख ते १० लाख खर्च, ४ लाख विवाहात किमान २५ लाख खर्च, ५० हजार विवाहात किमान ५० लाख तर ५० लग्नात किमान १ कोटी किंवा त्याहून अधिक खर्च केला जाईल.