मलाला युसुफझाई विवाहबद्ध

नोबेल शांती पुरस्कार विजेती पाकिस्तानची मलाला युसुफझाई मंगळवारी बर्मिघम येथे अतिशय साध्या कार्यक्रमात विवाहबद्ध झाली असून ट्वीटरवर मलालाने तिच्या निकाहचे चार फोटो शेअर केले आहेत. त्याखाली ती लिहिते,’ मी विवाहित बनले आहे. माझ्या जवळच्या परिवाराच्या उपस्थितीत अतिशय साध्या कार्यक्रमात असर आणि मी विवाहबद्ध झालो आहोत. आजचा दिवस माझ्यासाठी अनमोल असून तुमचे आशीर्वाद द्या.’

मलाला आता चोवीस वर्षाची असून मुलींच्या शिक्षणासाठी काम करणारी पाकिस्तानी कार्यकर्ती आहे. मलाला सर्वात कमी वयाची नोबेल पुरस्कार विजेती आहे. २०१२ मध्ये तिला जागतिक प्रसिद्धी मिळाली होती. मुलींच्या शिक्षणाच्या हक्कासाठी लढा दिला म्हणून उत्तर पाकिस्तान मध्ये तालिबानी लोकांनी तिच्या डोक्यात गोळी घातली होती. त्या जीवघेण्या हल्ल्यातून बरी झाल्यावर तिने तिचे काम सुरूच ठेवले आणि संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात शिक्षणात लैगिक समानता आवश्यक आहे असे भाषण केले तेव्हा मलाला १६ वर्षाची होती.

मलाला मुळे पाकिस्तानमध्ये मुलीना शिक्षण अधिकार देणारे विधेयक मान्य झाले. ‘आय अॅम मलाला’ हे तिचे पुस्तक प्रसिद्ध झाले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.