खेळण्यातले नाही खरे आहे हे रंगीबेरंगी शहर

जगातील सुंदर शहरे, याबाबत अनेकदा चर्चा होतात. काही शहरांना निसर्गाचे वरदान असते, काहीना हिरवाईचे. काही शहरांना बर्फाच्छादित पहाड आकर्षक बनवितात तर काही शहरे सुंदर समुद्र, नदी किनार्यांमुळे पर्यटकांचे आकर्षण बनतात. युक्रेन मधील एक शहर तेथील आकर्षक आणि खेळण्यातील वाटावीत अश्या रंगीबेरंगी इमारतींनी सजलेले असून या शहरातील इमारतींची बांधणी लहान मुलांच्या लेगो खेळण्यांची आठवण करून देणारी आहे. युक्रेनची राजधानी कीव मध्येच ही मोठी वसाहत आहे. हा भाग एखाद्या लँडस्केप पेंटिंग प्रमाणे अतिशय मनोहर आणि उठावदार आहे.

१९५० ते ६० या काळात बांधलेले सोविएट टॉवर्स या वसाहतीचा एक भाग आहेत. येथील इमारती डिस्ने लँड प्रमाणे विविध रंगी आणि फारच सुंदर आहेत. जुन्या राखाडी रंगांच्या इमारतींना वेगळे रूप मिळावे या साठी ही रचना केली गेली आहे. लाल, हिरव्या,पिवळ्या, जांभळ्या रंगानी केवळ इमारतीच्या भिंतीच नाही तर छते, दरवाजे सुद्धा रंगले आहेत. त्यामुळे हे शहर लहान मुलांच्या खेळण्यातील असावे असा भास होतो.

दमयरे वॅसिलिव, एलेक्स्त्रेन्ड पेपिव आणि ओल्गा एल्फीरोवा यांनी हा प्रोजेक्ट ११ वर्षात पूर्ण केला आहे. त्यासाठी बजेट लिमिटेड होते. सध्या या शहरात २० हजार नागरिक राहत आहेत आणि दरमहा २०० घरे विकली जात आहेत असे समजते. लॉस एंजेलिस टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत दमयरे म्हणाले साधारण सामग्री आणि साधेच तंत्रज्ञान याचा वापर आम्ही केला. या शहरासाठी महागड्या मटेरियल पेक्षा डिझायनर्सनी त्यांच्या कल्पनाशक्तीचा जास्त प्रमाणात आणि पुरेपूर वापर करण्यावर भर दिला. या शहरात ८५०० सदनिका बांधल्या गेल्या आहेत.