ऐतिहासिक नोटबंदी नंतर अशी लावली गेली जुन्या नोटांची विल्हेवाट
८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री साडेआठ वाजता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील ५०० व १००० रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली आणि केवळ भारतातच नाही तर जगभरात त्याची प्रतिक्रिया उमटली. या ऐतिहासिक निर्णयामुळे १५.४१ लाख कोटी मूल्याच्या ५०० व १००० रुपयाच्या नोटा एका क्षणात कागदी तुकडे बनून गेल्या. त्यावेळी एकूण चलनात या मूल्याच्या नोटांचा वाटा ८६ टक्के इतका होता. इतक्या प्रचंड संखेने बेकार झालेल्या या नोटांचे पुढे काय झाले याचा प्रश्न अनेकांना पडला होता. न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या एका रिपोर्ट मध्ये त्याचा खुलासा केला गेला आहे.
या बेकार ठरलेल्या चलनी नोटा हजारो टन वजनाच्या होत्या. त्यातील बराच मोठा हिस्सा द.आफ्रिकेत पाठविला गेला. आणि या नोटातील ८०० टन वजनाच्या नोटा केरळच्या उत्तर मलबार भागातील एका प्लाय बोर्ड बनविणाऱ्या कंपनीत प्रोसेस करण्यासाठी पाठविल्या गेल्या. या नोटांचे बारीक तुकडे करून त्यापासून हार्ड बोर्ड बनविले गेले. या हार्डबोर्डचा वापर म. गांधी यांच्या क्षतीग्रस्त स्मारकाची दुरुस्ती करण्यासाठी केला गेला.
रिझर्व्ह बँकेने चलनाबाहेर केलेल्या या नोटांचे तुकडे करण्यासाठी देशभरात २७ श्रेडींग सेंटर सुरु केली होती त्यातील एका मलबार मध्ये होते. वेस्टर्न इंडिया प्लायवूड लिमिटेड कडे नोटबंदी जाहीर होण्यापूर्वी महिनाभर चलनातील जुन्या जीर्ण नोटा पाठविल्या गेल्या होत्या. या कंपनीत ८०० टन वजनाच्या आणि चलनाबाहेर काढल्या गेलेल्या ५०० व १ हजार रुपयांच्या नोटांपासून हार्ड बोर्ड बनविण्याचे काम वर्षभर सुरु होते. अर्थात ही कंपनी नोटबंदी पूर्वीपासूनच रिझर्व बँकेबरोबर काम करत होती. नोटांपासून हार्ड बोर्ड बनविण्याचा निर्णय नंतर घेतला गेला होता. त्यासाठी कंपनीने रीतसर निविदा भरली होती.
चलनी नोटांसाठी वापरला जाणारा कागद उच्च गुणवत्तेचा असतो. त्यामुळे प्रथम रीसायकलिंग करून त्यापासून ब्रिक्स बनविल्या जातात मग हे ब्रीकेवेट रिझर्व बँकेला परत पाठविले जातात आणि मग त्यापासून प्लाय बनविले जाते असे समजते.