डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने घेतली मोठी झेप


नवी दिल्ली – ८ नोव्हेंबर २०२१ रोजी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने मोठी झेप घेतली आहे. दरम्यान परकीय चलन बाजार काल बंद झाल्यावर डॉलरच्या तुलनेत रुपया ४३ पैशांनी वाढून ७४.०३ वर पोहोचला. रुपया आंतरबँक परकीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत ७४.२५ च्या पातळीवर उघडला. यानंतर याचा उच्चांकी ७३.९८ आणि नीचांकी ७४.२५ वर पोहोचला. रुपयाला आधार देशांतर्गत शेअर बाजारातील सकारात्मक कलामुळे मिळाला.

परकीय चलन बाजारात दिवसभराच्या अस्थिरतेनंतर, देशांतर्गत चलन (भारतीय चलन) गुरुवारच्या तुलनेत घसरले आणि ७४.०३ च्या पातळीवर बंद झाले. डॉलरच्या तुलनेत गुरुवारी रुपया ७४.४६ वर बंद झाला होता. विदेशी चलन बाजार दिवाळी बलिप्रतिपदेमुळे शुक्रवारी बंद होते. तज्ज्ञांच्या मते, फेडरल रिझर्व्हकडून दर वाढवण्याचा उत्साह नसल्यामुळे डॉलरवर दबाव वाढला आणि रुपयाने मजबूती नोंदवली.

सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची तुलनात्मक स्थिती दर्शविणारा डॉलर निर्देशांक ०.०४ टक्क्यांनी घसरून ९४.२८ च्या पातळीवर व्यवहार करत होता. एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक जतिन त्रिवेदी यांनी सांगितले की रुपया ७३.७५च्या पातळीवर जाऊ शकतो. ब्रेंट क्रूड फ्युचर्स १ टक्क्यांनी वाढून $८३.५७ प्रति बॅरलवर पोहोचले.