ब्रिटनच्या मान्यता यादीमध्ये कोव्हॅक्सिनचा समावेश


लंडन : स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ लस देशातील ज्या लोकांनी घेतली आहे, ते आता व्यक्ती कोणत्याही अडथळ्यांशिवाय ब्रिटनला जाऊ शकणार आहेत. कारण ब्रिटन कोव्हॅक्सिनचा मान्यता यादीमध्ये 22 नोव्हेंबरपासून समावेश करणार आहे. ब्रिटनने यापूर्वी कोव्हॅक्सिनला मंजुरी दिली नव्हती. भारतीय बनावटीच्या कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्यानंतर ब्रिटननेही लसीच्या वापरास मान्यता दिली आहे.

काही दिवसांपूर्वी कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली होती. जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिल्यानंतर ब्रिटन सरकारने हा निर्णय घेतला. सोमवारी ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी ट्विट केले की, ब्रिटनला जाणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी. जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतर, आता 22 नोव्हेंबरपासून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीयांना ब्रिटनच्या प्रवासादरम्यान सेल्फ-आयसोलेशन करावे लागणार नाही.

जागतिक आरोग्य संघटनेची हैदराबादच्या भारत बायोटेक या लसनिर्मिती करणाऱ्या कंपनीची निर्मिती असलेल्या कोव्हॅक्सिन लसीला काही दिवसांपूर्वी मान्यता मिळाली आहे. कोव्हॅक्सिन ही भारताने बनवलेली स्वतःची कोरोना प्रतिबंधक लस आहे. भारत सरकारच्या औषध महानियंत्रकांनी जवळपास वर्षभरापूर्वीच या लसीच्या भारतातील वापराला परवानगी दिली होती. भारत बायोटेकसोबत आयसीएमआर आणि राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेने एकत्रित रित्या ही लस बनवली आहे. ऑस्ट्रेलियाने दोन दिवसांपूर्वीच कोव्हॅक्सिन लसीला परवानगी दिली होती, त्याबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलिया सरकारचे आभार व्यक्त केले होते.

भारत बायोटेकचे संशोधन आणि निर्मिती असलेल्या या लसीला जागतिक आरोग्य संघटेनची परवानगी मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासात येत असलेल्या अडचणी दूर होण्यास मदत होईल. भारतातून अन्य देशांमध्ये जाणाऱ्यांनी कोव्हॅक्सिन लस घेतलेली असेल, तर त्यांना संबंधित देशात गेल्यानंतर क्वारंटाईन नियमाचे पालन करावे लागायचे.