ठाणे महापालिकेचे कर्मचाऱ्यांना फर्मान, लस नाही तर पगार नाही


ठाणे – देशभरात सध्या व्यापक स्तरावर लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील लसीकरणाने वेग पकडला असून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. बऱ्याच प्रमाणात राज्य सरकारकडून निर्बंध देखील शिथिल करण्यात आले आहेत.

पण, याचा विपरीत परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणावर बाजारपेठांमध्ये गर्दी दिसू लागल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. त्यातच ठाणे महानगर पालिकेकडून आता कर्मचाऱ्यांसाठी नवा फर्मान जारी करण्यात आला असून पात्र असून देखील ज्या कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली नाही, त्यांचा पगार थांबवण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे.