एसटी कर्मचाऱ्यांनी ही आरपारची लढाई लढू नये ; अनिल परब यांचे आवाहन


मुंबई – राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना ही आरपारची लढाई लढू नये, असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर जोपर्यंत कमिटीचा निर्णय़ येत नाही, तोपर्यंत कुठलीही गोष्ट कबूल करणे किंवा नाकारणे हे आता योग्य होणार नाही. कारण, आता जर कुठलाही निर्णय घेतला, तर तो उच्च न्यायालयाचा अपमान ठरेल. असे देखील परब यांनी सांगितले आहे.

तसेच, न्यायालायने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या विरोधात आदेश दिला होता आणि हा संप बेकायदेशीर ठरवला होता. त्यानंतर देखील काही संघटनांनी, एसटीच्या संपाची नोटीस दिली होती आणि म्हणून आम्ही उच्च न्यायालयात गेलो होतो. हा संप बेकायदेशीर असल्याचे उच्च न्यायालयाने जाहीर केलेले आहे. हे जाहीर केल्याच्या नंतर देखील, हा संप सुरू असल्याचे काल आम्ही उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, उच्च न्यायालयाने सूचना केली की याबाबत तुम्ही अवमान याचिका दाखल करू शकतात. म्हणून एसटी महामंडळ अवमान याचिका दाखल करत असल्याचेही परब यांनी म्हटले आहे.

अनिल परब पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, कर्मचाऱ्यांशी मी सतत बोलत राहणार. त्यांना मी सतत आवाहन करत राहणार, याच्यातून यशस्वी, चांगला मार्ग काढण्याचा मी सतत प्रयत्न करत राहणार. कारण, कर्मचाऱ्यांचे जसे हित आहे, तसेच प्रवाशांची देखील गैरसोय होणार नाही, याची काळजी मला घ्यायची आहे. महामंडळावर प्रचंड आर्थिक भार आहे. महामंडळाची आर्थिक परिस्थिती मागील दोन वर्षात कोरोना काळात फारच खालावली. सध्या महामंडळ १२ हजार कोटी संचित तोट्यात असल्यामुळे महामंडळाची आर्थिक परिस्थिती ही अतिशय बिकट आहे. तरी देखील या सगळ्या गोष्टींचा विचार हा कमिटीच्या समोर होईल, त्यामुळे जोपर्यंत कमिटीचा निर्णय़ येत नाही. तोपर्यंत कुठलीही गोष्ट कबूल करणे किंवा नाकारणे करणे हे आता योग्य होणार नाही. कारण, जर आता कुठलाही निर्णय घेतला, तर तो उच्च न्यायालयाचा अपमान ठरेल.

तसेच, आता हा जो काही आंदोलनाचा भाग आहे. आता हा बेकायदेशीर ठरलेला आहे. उद्या आम्ही ही गोष्ट उच्च न्यायालयात सांगू आणि मग ज्या पद्धतीने उच्च न्यायालय सांगेल. त्यावरीत पुढे आम्ही निर्णय़ घेऊ. मला असे पुन्हा पुन्हा वाटते आहे की ही आरपारची लढाई एसटी कर्मचाऱ्यांनी लढू नये. त्याचे कारण असे आहे की, मला देखील एसटी कर्मचाऱ्यांच्याबाबत सहानभुती आहे. सतत मी त्यांच्याशी चर्चा करत आहे आणि सतत करत राहणार. परिवहनमंत्री म्हणून माझे त्यांना समजवण्याचे व यातून योग्य मार्ग काढण्याचे कर्तव्य असल्याचे परब यांनी सांगितले.

त्याचबरोबर, आम्ही काल ज्या खासगी बसेस आहेत त्यांना, स्कूल बसेसना स्टेट परमीटचे नोटीफिकेशन काढलेले आहे. जोपर्यंत संप सुरू आहे, तोपर्यंत लोकांची गैरसोय होणार नाही. याबाबतीतली काळजी आम्ही घेतो आहोत आणि त्याबाबतच्या सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत. तसेच, उद्या काय होणार हे न्यायालयाच्या आदेशानेच ठरणार आहे. वातावरण चिघळू नये याबाबत सरकार पूर्णपणे काळजी घेईल. त्यांच्या नेत्यांशी मी देखील बोलत आहे. परंतु कोणाच्या तरी भडकवण्यामुळे कामगारांनी स्वतःचे नुकसान करून घेऊ नये, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून मी सतत कामगार नेत्यांशी बोलत आणि चर्चा करत असल्याची माहिती देखील परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली आणि त्यांचे देखील हेच म्हणणे आहे की, कामगारांच्या मागण्यांचा सामोपचाराने विचार करूनच त्यावर निर्णय घेतला जाईल. बाकीच्या त्यांच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत. परंतु, राज्य शासनात विलिनीकरणाची जी त्यांची मागणी आहे. हा केवळ एका महामंडळाचा विषय नाही. अशी अनेक महामंडळे आहेत, हा बऱ्याच महामंडळांचा विषय आहे. त्यावर सरकारला तो धोरणात्मक निर्णय़ घ्यावा लागेल. पण असा धोरणात्मक निर्णय़ घेताना, सरकारला राज्याची आर्थिक स्थिती, येणारे उत्पन्न, महामंडळाचा सगळा खर्च, जमा या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे एक-दोन दिवसात असा निर्णय होत नसल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केले.