आता नवाब मलिकांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांनी एफआयआर दाखल करावा- आशिष शेलार


मुंबई – देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाला दुजोरा देत नवाब मलिकांवर आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर पत्रकार परिषद घेत मलिक यांच्याविरोधात हल्लाबोल केला. राज्यातील ठाकरे सरकारचे कपडे कसे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले आहेत, हे फडणवीस यांनी उघड केल्याचे शेलार यांनी म्हटले. तसेच आता या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वत:च एफआयआर दाखल करावा आणि चौकशी करावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

मलिक यांनी फडणवीसांनी केलेले आरोप मान्य केल्याचा दावा शेलार यांनी केला. नवाब मलिक यांनी दीडपट कमी किंमतीत जागा मिळवली, हे मान्य केल्याचे शेलार यांनी म्हटले. आम्हाला 25 रु. स्क्वेअर फूटमध्ये जमीन घ्यावी लागली, असे नवाब मलिक सांगत असल्याचेही शेलार यांनी म्हटले. संपूर्ण इमारत भाडयाने कमी किंमतीत कशी मिळते, नवाब मलिक सामान्य जनतेला मूर्ख समजतात का, असा सवालही शेलार यांनी केला.

मलिक यांचे मुंबई 1993 बॉम्ब प्रकरणी आरोपीसोबत संबंध असल्याचे शेलार यांनी म्हटल्यामुळे यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांच्यावर एफआयआर दाखल कारावा, अशी मागणी शेलार यांनी केली.