जमीन खेरेदीच्या फडणवीसांच्या आरोपावर नवाब मलिक यांचे स्पष्टीकरण


मुंबई – एनसीबी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून मुंबईत सुरू असलेला आरोप-प्रत्यारोपाचा खेळ आता शिगेला पोहोचला आहे. एकमेकांविरोधात नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांनी आरोप केले आहेत. वानखेडे कुटुंबानंतर नवाब मलिकांनी भाजपच्या नेत्यांवर देखील ड्रग्ज संदर्भात गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्जच्या व्यवसायात सहभाग असल्याचे म्हणाले होते. दरम्यान, नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात सुरु असलेल्या शाब्दिक युद्धानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी देखील या आरोपाला उत्तर दिले आहे.

दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. पण त्यांचे फटाके भिजले त्यामुळे त्याचा आवाज नाही आला, असे मलिक म्हणाले. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या फडणवीसांच्या आरोपावर मलिक म्हणाले, देवेंद्रजी आपण १९९९ मध्ये मुंबई शहरात पहिल्यांदा आमदार बनून आले. ६२ वर्षाच्या आयुष्यात या शहरात तुमच्याआधी दिवंगत दिवंगत मुंडे साहेब होते, जे दाऊद सोबत लोकांना जोडत होते. जेव्हा आम्ही मंत्री होतो, तेव्हा सुद्धा मुंडे साहेबांचे भाषण विधानसभेत होत असत. पण एवढ्या वर्षात आमच्यावर कोणी आरोप लावू शकले नाही. आज एका जागेसंदर्भात काही कागदपत्र तुम्ही लोकांसमोर ठेवली. आम्ही माफियांकडून कवडीमोल जमीन खरेदी केली, असा आरोप तूम्ही केला. पण तुम्हाला माहिती देणारे कच्चे खिलाडी आहेत.

नवाब मलिक म्हणाले, देवेंद्रजी तुम्ही जर मला सांगितले असते, तर मीच तुम्हाला कागदपत्र दिले असते. पण तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरु केला. आज मी सगळ्या गोष्टी सांगणार नाही. पण उद्या सकाळी १० वाजता तुमचा अंडरवर्ल्डशी असलेला खेळ आणि मुख्यमंत्री असतांना अंडरवर्ल्डचा सहारा घेऊन तुम्ही कशाप्रकारे संपुर्ण शहराला बंदी बनवले होते. याची माहिती मी देणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी जमीन खेरेदी प्रकरणात बनावट भाडेकरु बनवण्यात आल्याचा आरोप केला. यावर मलिक म्हणाले, फडणवीसांनी आरोप केलेल्या कुर्ल्यामधील जागेवर मदिनेत्तूल आमान कोऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. १९८४ मध्ये तिथे बिल्डींग बांधण्यात आली. जिला गोवावाला कंपाऊंड असे म्हटले जाते. यामध्ये मुदीरा प्लंबर यांनी रस्सीवाला यांना विकासाचे अधिकार देत त्याठिकाणी १४० ते १५० घरे बनवून सामान्य लोकांना विकले. त्याच्यामागे असलेल्या जमिनीवर झोपडपट्टी आहे. त्याठिकाणी आमचे एक गोडाऊन आहे. मुनिरा यांनी तो ३० वर्षापासून भाड्याने एका कंपनीला दिला आहे. आमची त्याच मालमत्तेत चार दुकाने होती.

नवाब मलिक पुढे म्हणाले, १९९६ मध्ये जेव्हा शिवसेना-भाजपचे सरकार होते. तेव्हा ९ नोव्हेंबरला राज्यात मी शिवसेना-भाजप सत्तेत असताना पोटनिवडणूकीत जिंकलो होतो. त्या निवडणूकीचे कार्यालय देखील त्याच गोवावाला कंपाऊंड बिल्डींगमध्ये होते. आम्ही तिथे भाडेकरु होतो. त्यानंतर मुनिरा यांनी त्या भाड्याने दिलेल्या गोडाऊनचा मालक हक्क द्यायचा असल्याचे आम्हाला सांगितले. आम्ही त्यांच्याकडून गोडाऊनची मालकी घेतली. या दरम्यान पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर सलीम पटेल यांच्याशी आम्ही खरेदी केली, त्याचे सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्याची जी किंमत होती, ती आम्ही दिली. देवेंद्र फडणवीस यांनी वाढवून चढवून बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्रयत्न केला.

सरदार शाहवली खान यांचे नाव घेण्याचा प्रयत्न केला. पण देवेंद्रजी यांना त्यांचे माहितीस्त्रोत हे सांगू शकले नाहीत की त्याच गोवावाला कंपाऊंडमध्ये सरदार शाहवली वली खान यांचे घर आहे. कोणत्याही दबावात किंवा अंडरवर्ल्डशी सबंध असलेल्या लोकांकडून आम्ही ही मालमत्ता खरेदी केली नाही. तुम्ही बॉम्ब फोडणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हटले होते. पण हा बॉम्ब नव्हता. उद्या सकाळी १० वाजता अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब नवाब मलिक मुंबईत फोडणार आणि देशाला सांगणार की देवेंद्र फडणवीस यांनी कशाप्रकारे अंडरवर्ल्डच्या सहाऱ्याने शहराला बंदी केले होते, असा इशारा देखील मलिक यांनी फडणवीस यांना दिला.