नवाब मलिकांच्या कुटुंबियांना दाऊदच्या निकटवर्तीयांनी विकली जमीन; फडणवीसांचा गंभीर आरोप!


मुंबई – एनसीबी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून मुंबईत सुरू असलेला आरोप-प्रत्यारोपाचा खेळ आता शिगेला पोहोचला आहे. एकमेकांविरोधात नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांनी आरोप केले आहेत. एनसीबी आणि समीर वानखेडेंच्या अनुषंगाने भाजपवर देखील आरोप केले गेले आहेत. आता या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत कोणते मुद्दे मांडणार आणि कोणता मोठा गौप्यस्फोट करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.

ज्याप्रमाणे मी घोषणा केली होती की काही गोष्टी दिवाळीनंतर तुमच्यासमोर आणेन. थोडा उशीर झाला. कारण कागद गोळा करत होतो, काहींचे पत्रकार परिषदेचे दिवस आधीच बुक होते. मी सांगणार आहे ती सलीम जावेदची स्टोरीही नाही आणि इंटरव्हलनंतरचा चित्रपट देखील नाही. फार गंभीर आणि देशाच्या सुरक्षेशी जोडलेला हा मुद्दा आहे.

१९९३ चा सरदार शहावली खान हा गुन्हेगार असून तो कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. ती शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. टायगर मेमनच्या नेतृत्वात तो फायरिंगच्या ट्रेनिंगमध्ये सहभागी झाला. बीएसई आणि पालिकेमध्ये बॉम्ब कुठे ठेवायचे, याची रेकी त्यानी केली होती. बॉम्बब्लास्टच्या कारस्थान मांडणीवेळी टायगर मेमनच्या घरी ते उपस्थित होते. टायगर मेमनच्या घरी गाड्यांमध्ये त्यानी आरडीएक्स भरले. याविषयी साक्षीदारांनी साक्ष दिल्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

जेव्हा इफ्तार पार्टीमध्ये मोहम्मद अली इशाक पटेल उर्फ सलीम पटेल. आर. आर. पाटील गेले होते, तेव्हा त्यांचा गुन्हेगारासोबत फोटो व्हायरल झाला होता. त्यांचा दोष काही नव्हता. पण ज्या दाऊदच्या माणसासोबत म्हणून त्यांचा फोटो व्हायरल झाला, तोच हा सलीम पटेल. तो हसीना पारकरचा बॉडीगार्ड, ड्रायव्हर, फ्रंटमॅनही होता. २००७मध्ये हसीना पारकरला अटक झाली, तेव्हा सलीम पटेललाही अटक झाली. दाऊदनंतर हसीना पारकरच्या नावाने संपत्ती गोळा केली जायची. पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेलच्या नावाने करून पैसा गोळा केला जायचा. जमीन लाटण्याच्या धंद्यातला सलीम पटेल हा सर्वात प्रमुख माणूस होता.

कुर्ल्यामध्ये २.८० एकर जागा १ लाख २३ हजार स्क्वेअर फूटची जागा ज्याला गोवावाला कंपाऊंड असे म्हटले जाते. गोवावाला म्हणून व्यक्ती होते, ही जागा त्यांची होती. ही जागा कुर्ल्यात एलबीएस रस्त्यावर आहे. या जमिनीची एक रजिस्ट्री सॉलिडस नावाच्या कंपनीसोबत झाली. मरियमबाई गोवावाला, मुदीरा प्लंबर या दोघांकडून सलीम पटेल हे पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर आहे. विक्री करणारा सरदार शहावली खान आहे. म्हणजे या जमिनीची विक्री या दोघांनी मिळून सॉलिडस कंपनीला केली. नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची ही कंपनी आहे. घेणाऱ्याची सही फराज मलिक नावाच्या व्यक्तीची आहे. या सॉलिडसमध्ये २०१९मध्ये खुद्द नवाब मलिक देखील होते. त्यांच्या कुटुंबाचे लोक आजही त्यात आहेत.

२००५ मध्ये कुर्ल्याच्या फोनिक्स मार्केटच्या जमिनीवेळीच २ हजार रुपये प्रती चौरस फूट दराने खरेदी झाली. रेडीरेकनर रेड ८५०० आणि मार्केट रेट २०५३ दराने घेतली गेली. ३० लाखात ही जमीन खरेदी केली गेली. त्यातही १५ लाखांचं पेमेंट हे मालकाला न मिळता, त्यांचा पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर सलीम पटेलच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर १० लाख रुपये शहावली खान ज्याला सरदार खान म्हणतात, त्याला मिळाले. त्यातही ५ लाख नंतर मिळतील, असे लिहिण्यात आले. म्हणजे २० लाखात एलबीएस रोडवर ३ एकरच्या जमिनीचा व्यवहार झाला.

हा सौदा २००३मध्ये झाला, तेव्हा नवाब मलिक मंत्री होते. नवाब मलिक यांना अंतिम रजिस्ट्री झाली त्याच्या काही दिवस आधी आपले पद सोडावे लागले. पण तुम्हाला माहिती नव्हते की सलीम पटेल कोण आहे? मुंबईच्या गुन्हेगारांकडून तुम्ही जमीन खरेदी का केली? मुंबईत बॉम्बब्लास्ट करणाऱ्यांकडून तुम्ही जमीन का खरेदी केली? अशा कोणत्या कारणामुळे त्यांनी एलबीएसमधील ३ एकरची जमीन एवढ्या स्वस्तात दिली. या आरोपींवर टाडा लागला होता. टाडाच्या कायद्यानुसार आरोपीची सगळी मालमत्ता सरकार जप्त करते. मग टाडाच्या आरोपीची जमीन जप्त होऊ नये, यासाठी तुम्हाला ट्रान्सफर केली गेली का?

फार गोंधळ या सगळ्या व्यवहारात आहे. याच मालमत्तेमध्ये ते २००३मध्ये टेनंट देखील झाले, मग ट्रान्सफर केली, मग पुन्हा खरेदी केली. हा थेट अंडरवर्ल्डशी संबंध दिसत आहे. मला या गोष्टीचे दु:ख आहे. तुम्ही मुंबई बॉम्बब्लास्टच्या दुर्दैवी घटनेची आठवण काढा. ज्यांनी हा कट रचला, रेकी केली, आरडीएक्स भरले अशा व्यक्तीसोबत तुम्ही व्यवहार करता.अशा एकूण ५ मालमत्ता आहेत, ज्यापैकी चारमध्ये १०० टक्के अंडरवर्ल्डचा संबंध आहे. २००५पासून २ वर्षांपूर्वीपर्यंतचे हे व्यवहार आहेत. ही कागदपत्र मी संबंधित यंत्रणेकडे देईन. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनाही हे सगळे पुरावे मी देणार आहे. त्यांनाही कळेल, की त्यांच्या मंत्र्यांनी काय करून ठेवले आहे.