विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर


मुंबई – राज्यातील विधानपरिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १० डिसेंबर रोजी या सहा जागांसाठी मतदान होणार असून, १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या आठ आमदारांचा कार्यकाळ १ जानेवारी २०२२ रोजी जरी संपत असला, तरी सहा जागांसाठीच निवडणूक होत आहे.

ज्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यामध्ये शिवसेनेची रामदास कदम यांची मुंबईतील जागा, काँग्रेसची भाई जगताप यांची मुंबईतील जागा आणि सतेज पाटील यांची कोल्हापूरमधील जागा, तसेच भाजपची धुळे-नंदुरबार येथील अमरीश पटेल यांची जागा व नागपूर मधील गिरीश व्यास यांची जागा याचबरोबर शिवसेनेची अकोला-बुढाणा-वाशीम येथील गोपीकिशन बाजोरिया यांच्या जागेचा समावेश आहे. तर, सोलापूर व अहमदनगर येथील जागेसाठी निवडणूक होणार नाही.

असा आहे निवडणूक कार्यक्रम –

  • अधिसूचना जाहीर – १६ नोव्हेंबर
  • अर्ज दाखल करण्याची तारीख – २३ नोव्हेंबर
  • अर्जाची छाननी – २४ नोव्हेंबर
  • अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – २६ नोव्हेंबर
  • मतदान – १० डिसेंबर
  • मतमोजणी १४ डिसेंबर