भारताची डोकेदुखी वाढवण्यासाठी चीन पाकिस्तानला देत आहे अत्याधुनिक युद्धनौका


बीजिंग – भारतावर कुरघोडी करण्याकरिता पाकिस्तानचे आणि चीन हे दोन्ही देश सातत्याने प्रयत्न करत आले आहेत. त्याचबरोबर हे दोन्ही देश एकमेकांना मदत करत परस्पर सहकार्यही वाढवत आले आहे. याचाच एक भाग म्हणून गेली अनेक वर्ष चीन पाकिस्तानला लष्करी मदत करत आला आहे. याआधी चीनने पाकिस्तानला JF-17 हे चौथ्या श्रेणीतील लढाऊ विमान विकसित करायला मदत केली होती. आता तर पाकिस्तान वायू दलाचे JF-17 हे महत्त्वाचे लढाऊ विमान आहे.

तसेच युद्धनौकांच्या बाबतीतही पाकिस्तानला चीन मदत करत आहे. अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट Type 054 ही युद्धनौका चीन पाकिस्तानला देणार आहे. तर पुढील काही दिवसांत पाकिस्तानला एक युद्धनौका मिळणार आहे. तसेच पुढील ३ वर्षात पाकिस्तानला आणखी ३ युद्धनौका चीन सुपुर्त करणार आहे.

सुमारे ४ हजार टन वजनाची Type 054 ही फ्रिगेट- युद्धनौका जगातील अत्याधुनिक युद्धनौकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. रडारवर पटकन शोधता येणार नाही अशी या युद्धनौकेची रचना आहे. जमिनीवर, हवेत विविध प्रकारची क्षेपणास्त्रे डागण्याची या युद्धनौकेची क्षमता असून पाणबुडीविरोधी कारवाईतही ही युद्धनौका दर्जेदार समजली जाते.

चीनच्या नौदलात याआधीच अशा २५ पेक्षा जास्त युद्धनौका या कार्यरत आहेत. आता चीनी बनावटीच्या अशा चार युद्धनौका पुढील काही वर्षात पाकिस्तानकडे असतील. यामुळे निश्चितच भारताची डोकेदुखी वाढणार आहे. युद्धप्रसंग उद्भवल्यास Type 054 युद्धनौका या भारतीय नौदलापुढे मोठे आव्हान निर्माण करु शकतात, अशी या युद्धनौकेची क्षमता आणि ताकद आहे.