भाजप नेता म्हणतात; माझ्या एका खिशात ब्राह्मण, तर दुसऱ्या खिशात बनिया


भोपाळ – आता मध्य प्रदेशच्या राजकारणात भाजपचे राज्य प्रभारी पी. मुरलीधर राव यांनी खळबळ उडवून दिली आहे. ब्राह्मण आणि बनिया (वाणी) समाजाबद्दल पी मुरलीधर राव यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर या प्रकरणी त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या एका खिशात ब्राह्मण आणि दुसऱ्या खिशात वाणी असल्याचे मुरलीधर राव यांनी म्हटले. पण, आपल्या वक्तलव्यावर नंतर स्पष्टीकरण दिले आहे. भाजप आगामी काळात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गावर लक्ष केंद्रित करत आहे. तर दुसरीकडे मुरलीधर यांच्या या वक्तव्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

कधी ब्राह्मण-वाण्यांचा भाजप हा पक्ष होता, तर कधी एससी, एसटी, ओबीसींचा पक्ष, असे का? असे मुरलीधर राव यांना विचारण्यात आले. आपण विकासाच्या गप्पा मारतो, मात्र जातीच्या नावावर मते का मागितली जातात? असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला होता. त्यावर मुरलीधर राव यांनी उत्तर दिले. माझ्या एका खिशात ब्राह्मण, दुसऱ्या खिशात वाणी आहेत. आता प्रश्न विचारला आहे, तर उत्तर ऐका. माझ्या व्होट बँकेत, माझ्या कार्यकर्त्यांमध्ये, माझ्या नेत्यांमध्ये ब्राह्मण आहेत, म्हणून त्याला ब्राह्मणांचा पक्ष म्हटले गेले. वाणी आहेत म्हणून वाण्यांचा पक्ष म्हटले. पक्ष सर्वांसाठी सुरू केला होता, पण माझ्याकडे त्यावेळी काही विशिष्ट वर्गातील लोक जास्त होते, त्यामुळे तुम्ही म्हणता की हा पक्ष त्यांचा आहे. आपण सर्वांचा पक्ष बनवण्याचे काम करत असल्याचे मुरलीधर राव म्हणाले.

पण आता मुरलीधर राव यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी त्यांच्या या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आहे. मुरलीधर राव यांच्या वक्तव्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध करत माफी मागण्याची मागणी केली. मुरलीधर राव हे भाजपचे मध्य प्रदेशचे प्रभारी आहेत, जे म्हणत आहेत की माझ्या खिशात ब्राह्मण आणि एका खिशात बनिया, त्या वर्गाचा हा काय आदर आहे? याच प्रभारींनी यापूर्वी भाजपच्या चार-पाच वेळा खासदार-आमदारांना अपात्र म्हटले आहे. त्यांच्या माजी नेत्याने क्षत्रिय समाजाचा अपमान केला आहे. त्यांनी या दोन्ही समाजांची माफी मागावी, असे कमलनाथ यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आपल्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर पी मुरलीधर राव यांनी संध्याकाळी स्पष्टीकरण दिले. आमचा पक्ष हा सर्व वर्गातील ब्राह्मण आणि वाण्यांचा पक्ष आहे. आमच्यासाठी वाणी आणि ब्राह्मण यांच्यात फरक नाही. भाजप सर्वांना बरोबर घेऊन चालली असल्याचे मुरलीधर राव म्हणाले.