देशात काल दिवसभरात १०,१२६ कोरोनाबाधितांची नोंद, तर ३३२ रुग्णांचा मृत्यु


नवी दिल्ली – भारतात कोरोनाबाधितांची संख्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीच्या वातावरणातही दिवसेंदिवस कमी होत आहे. काल दिवसभरात देशात एकूण १० हजार १२६ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्यामुळे गेल्या २६६ दिवसांतील ही सर्वात कमी दैनंदिन प्रकरणे आहेत. त्याच वेळी, देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १,४०,६३८ वर आली आहे, जी गेल्या २६३ दिवसांतील सर्वात कमी आहे. त्याच वेळी, काल दिवसभरात ३३२ कोरोनाबाधितांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा ४,६१,३८९ वर पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सलग ३२ दिवस कोरोनाच्या दैनंदिन बाधितांची संख्या २० हजारांपेक्षा कमी आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या देखील १,४०,६३८ वर आली आहे, जी एकूण रुग्णांच्या ०.४१ टक्के आहे. हा दर मार्च २०२० नंतरचा सर्वात कमी आहे. गेल्या २४ तासात अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत २,१८८ ने घट झाली आहे. रूग्णांचा राष्ट्रीय पुनर्प्राप्ती दर ९८.२५ टक्के आहे, जो मार्च २०२० पासून सर्वाधिक आहे.

आरोग्य मंत्रालयाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात एकूण १०,८५,८४८ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर एकूण चाचण्यांची संख्या ६१,७२,२३,९३१ झाली आहे. तर काल दिवसभरात कोरोना प्रतिबंधक लसीचे ५९,०८,४४० डोस देण्यात आले आहेत. ताज्या अहवालानुसार, आज सकाळी सात वाजेपर्यंत देशात लसीचे १,०९,०८,१६,३५६ डोस देण्यात आले आहेत.