जस्ट डायलवर स्पा मसाजच्या चौकशीनंतर मिळाले १५० मुलींचे ‘रेटकार्ड’


नवी दिल्ली – देशात डिजीटल क्रांती झाली आहे. या डिजीटल क्रांतीमुळे काही चांगल्या गोष्टी देखील घडत आहेत. काही वाईट गोष्टी देखील घडत आहे. त्यातच या तंत्रज्ञानाचा, सोशल मीडियाचा वापर अवैध धंदे करण्यासाठीही केला जातो. जस्ट डायल या साईटवर असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच उघडकीस आणला आहे. जस्ट डायलवरुन वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे.


जस्ट डायल या साईटवरुन स्पा मसाजबद्दल दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी खोटी चौकशी केली. त्यानंतर त्यांना १५० हून अधिक मुलींचे ‘रेट्स’ सांगणारे मेसेजेस आले. त्यासोबत या मुलींचे फोटोही पाठवण्यात आले होते. मालीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती दिली आहे.

मालीवाल आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, आम्ही जस्ट डायलवर फोन करुन स्पा मसाजची खोटी चौकशी केली. त्यानंतर आम्हाला ५० मेसेज आले, ज्यामधून आम्हाला १५० अधिक मुलींचे दर सांगण्यात आले. मी जस्ट डायल आणि दिल्ली पोलीस गुन्हे शाखेला समन्स बजावत आहे. या धंद्याला चालना देण्यासाठी जस्ट डायलची भूमिका काय? मालीवाल यांनी या ट्विटमध्ये या मेसेजेसचा स्क्रिनशॉटही पोस्ट केला आहे.