ट्वीटर वर अजित डोवाल यांना फॉलो करत असाल तर सावधान!

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची लोकप्रियता गेल्या काही दिवसात प्रचंड वाढली असून त्यांचे अनेक चाहते त्यांना सोशल मिडीयावर फॉलो करतात. या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने एक सावधानतेचा इशारा दिला आहे. डोवाल यांना त्यांचे अनेक चाहते ट्वीटरवर फॉलो करतात पण अजित डोवाल यांचे ट्वीटर वर अकौंट नाही आणि सोशल मीडियात त्यांच्या नावाने जेवढी अकौंट आहेत ती बनावट आहेत असे जाहीर केले गेले आहे.. त्यामुळे जे कुणी डोवाल यांना सोशल मिडीयावर फॉलो करत आहेत त्यांनी सावध राहावे असा इशारा दिला गेला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदर बागची या संदर्भात म्हणाले, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची सोशल मिडीयावर जेवढी अकौंट आहेत ती बनावट आहेत. डोवाल यांच्या फोलोअर्सची संख्याही मोठी आहे. डोवाल यांच्या कार्यशैलीमुळे त्यांची लोकप्रियता अफाट वाढली आहे पण डोवाल यांनी नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहण्यास प्राधान्य दिले आहे.

मुळात गंभीर स्वभावाचे डोवाल अगदीच गरज असेल तरच काही वक्तव्ये करतात. त्यांची खरी ओळख त्यांच्या कामातूनच होते. आयपीएस बनून करियरची सुरवात करणाऱ्या डोवाल यांच्याकडे हेरगिरीचा मोठा अनुभव आहे. पाकिस्तान मध्ये त्यांनी सात वर्षे रिक्षाचालक बनून हेरगिरी केली होती. ९० च्या दशकात काश्मीर मध्ये दहशतवाद्यांची समजूत घालण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले आणि त्यामुळेच १९९६ मध्ये तेथे निवडणुका होऊ शकल्या असे सांगितले जाते.