रशिया लवकरच जारी करणार डिजिटल रुबल
रशियाने त्यांचे चलन, रुबलच्या डिजिटल संस्करणाला लवकरच कायदेशीर मान्यता दिली जाणार असल्याचे संकेत दिले असून लवकरच डिजिटल रुबलचा नमुना जारी केला जाईल असे सांगितले जात आहे. कायदेशीर मान्यता दिल्यावर चाचणी स्वरुपात डिजिटल रुबल बाजारात आणला जाणार आहे. त्याचे परीक्षण, अनुभव लक्षात घेऊन मग तो चलन म्हणून वैध ठरविला जाईल. जानेवारी २०२२ मध्ये डिजिटल रुबल आणला जाईल असा रिपोर्ट रशियाच्या इजवेस्तीया या वर्तमानपत्राने दिला आहे.
देण्यात आलेल्या माहितीनुसार डिजिटल रुबलला प्रथमपासूनच लीगल टेंडर दर्जा मिळणार आहे. आता बाजारात ज्या क्रीप्टोकरन्सी आहेत त्यांना बहुतेक देशांनी अजून कायेशीर मान्यता दिलेली नाही. रशियाचे डिजिटल अर्थ विकास विभाग प्रमुख अलेक्सी मिनायेव यांच्या म्हणण्यानुसार डिजिटल रुबलचा सध्याच्या कुठल्याच क्रीप्टोकरन्सीशी कुठलाच संबंध असणार नाही. डिजिटल रुबल संदर्भात पहिला कायदा जानेवारी २०२२ मध्ये लागू होईल आणि त्यानंतर आणखी आठ कायदे लागू केले जातील. रशियाचा सेन्ट्रल बँकेने म्हणजे बँक ऑफ रशियाने २०२० मध्येच डिजिटल करन्सीचा नमुना पेश केला होता. डिजिटल रुबल आला तरी रोख रुबल चलनात कायम राहणार आहे असेही सांगितले जात आहे.
बँक ऑफ रशियाच्या म्हणण्यानुसार बिटकॉइन प्रमाणे रुबलमधली गुंतवणूक जोखीमीची नाही कारण डिजिटल रुबल सरकार जारी करणार आहे आणि त्याला सेन्ट्रल बँकेचे समर्थन आहे. भारतात सुद्धा डिजिटल रुपया चलनात आणण्याचा विचार सुरु असून जगातील अन्य अनेक देशही त्यांच्या चलनाचे डिजिटल संस्करण करण्याच्या विचारात आहेत.