फक्त या ठिकाणी वर्षातून दोन वेळा साजरी होते दिवाळी

देशभर आणि विदेशात सुद्धा अनेक ठिकाणी दिवाळी मोठ्या उत्साहात नुकतीच साजरी केली गेली. दिव्यांचा उत्सव म्हणून साजरी होणारी दिवाळी वर्षातून एकदा साजरी होते पण वाराणसी हे असे एकमेव शहर आहे जेथे वर्षातून दोन वेळा दिवाळी साजरी होते. अर्थात एका दिवाळीचा संबंध माणसांशी आहे तर दुसऱ्या दिवाळीचा संबंध देव देवतांशी आहे. या दिवाळीला देवदिवाळी असेच नाव असून ती कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा हि दिवाळी १९ नोव्हेंबर रोजी आहे. या दिवाळीची तयारी पूर्ण झाली आहे आणि या दिवाळीसाठी शहरात पर्यटक मोठ्या संखेने येत असल्याने सर्व हॉटेल्स बुक झाली आहेत. केवळ भारतातूनच नाही तर परदेशातून सुद्धा मोठ्या संखेने पर्यटक ही दिवाळी पाहण्यासाठी येतात.

या दिवशी वाराणसीच्या पवित्र गंगा नदीच्या ८४ घाटांवर लाखो दिवे लावले जातात. त्यामुळे जणू देवदेवता स्वर्गातून पृथ्वीवर आले असा भास होतो. नदीकाठी असे दिवे लावण्याचे महत्व मोठे आहे. याच दिवशी शंकराने त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी असेही म्हटले जाते. याच दिवशी विष्णूने दशावतारातील पहिला मत्स्य अवतार धारण केला होता असेही मानले जाते. हाच दिवस शीख धर्मियांचे गुरु नानक यांचा जन्मदिवस आहे. त्यामुळे त्याला नानक पौर्णिमा असेही म्हटले जाते.

देवदिवाळीच्या दिवशी तुळस आणि शाळीग्राम यांच्या पूजेला फार महत्व आहे. वाराणसी मध्ये देवदिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याची प्रथा काशी नरेश डॉ.विभूती नारायण सिंग यांनी १९८६ पासून सुरु केली असून आता त्याला महोत्सवाचे स्वरूप आले आहे.