काल दिवसभरात देशात 11 हजार 451 कोरोनाबाधितांची नोंद, तर 266 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्याप म्हणावे तसे कमी झालेले नाही. देशातील काही ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. शनिवारच्या तुलनेत काल कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचितशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. देशात शनिवारी 10 हजार 853 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती, तर यामध्ये रविवारी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या आकडेवारीनुसार देशात काल दिवसभरात 11 हजार 451 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. तर 266 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची देशातील संख्या चार लाख 61 हजार 57 एवढी झाली आहे.

दरम्यान देशाची चिंता एकट्या केरळ राज्याने वाढवली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी जवळपास 60 टक्के रुग्ण एकट्या केरळ राज्यात आहेत. काल दिवसभरात केरळमध्ये सात हजार 124 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 21 बाधितांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे.

तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात काल दिवसभरात 13 हजार 204 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. देशात उपचाराधीन बाधितांची संख्या एक लाख 42 हजार 826 एवढी झाली आहे. मागील 262 दिवसांतील ही सर्वात कमी उपचाराधीन रुग्णसंख्या आहे. देशात आतापर्यंत तीन कोटी 37 लाख 63 हजार 104 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे देशातील रिकव्हरी रेट 98.24 टक्के एवढा झाला आहे. देशाचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 1.26 टक्के एवढा झाला आहे. मागील 45 दिवसांपासून आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे.

दुसरीकडे देशात कोरोनावर मात करण्यासाठी वेगाने लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. काल दिवसभरात देशात 25 लाखांपेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे देशात 108 कोटी 47 लाख जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या डोसची संख्या आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आली असली, तरी शनिवारच्या तुलनेत त्यात काहीशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 892 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 16 बाधितांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात राज्यात 1,063 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात सक्रिय रुग्णसंख्या 14,526 एवढी असून रिकव्हरी रेट 97.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होत असून राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.