नवाब मलिक यांच्याविरोधात वानखेडेंच्या वडीलांचा अब्रुनुकसानीचा दावा


मुंबई – महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. मलिकांना मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने सांगितले आणि बुधवारी पुढील सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांना फटकारले आहे.

उद्यापर्यंत नवाब मलिक तुम्ही तुमचे उत्तर दाखल करा. तुम्ही ट्विटरवर उत्तर देऊ शकत असाल, तर तुम्ही न्यायालयातही उत्तर देऊ शकता, असे न्यायमूर्ती जामदार म्हणाले. दरम्यान, न्यायालयाने नवाब मलिक यांना तक्रारदार ज्ञानदेव वानखेडे यांच्याविरुद्ध आणखी कोणतेही विधान करण्यापासून रोखणारा कोणताही आदेश दिलेला नाही.

न्यायालयाला ज्ञानदेव वानखेडे यांची बाजू मांडणारे वकील अर्शद शेख यांनी सांगितले की, दररोज काही खोटे आणि बदनामीकारक वक्तव्य नवाब मलिक यांच्याकडून केले जात आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर वानखेडे कुटुंबियांबद्दल आणखी बदनामीकारक वक्तव्ये केली जात आहेत. आज सकाळीच मलिक यांनी समीर वानखेडेंच्या मेहुणीबद्दल एक ट्विट पोस्ट केले आहे. तसेच न्यायालयाने किमान या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत एकतर मलिक यांना ज्ञानदेव वानखेडे यांच्या कुटुंबाबद्दल वक्तव्य करण्यापासून रोखावे, अशी मागणी केली.

दाव्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागताना नवाब मलिक यांचे वकील अतुल दामले यांनी न्यायालयाला सांगितले की, आपल्या सज्ञान मुलांच्या वतीने ज्ञानदेव वानखेडे बोलू शकत नाही आणि इतर व्यक्तींनी सोशल मीडियावर काय टिप्पणी केली आहे, याचा दोष मलिकांना देता येणार नाही. ज्ञानदेव वानखेडे यांनी त्यांच्या दाव्यात नवाब मलिक यांच्याकडून त्यांचा मुलगा समीर वानखेडे आणि कुटुंबाविरुद्ध पत्रकार परिषद आणि सोशल मीडियाद्वारे बदनामीकारक टिप्पणी केल्याबद्दल सव्वा कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.