उपहार अग्नितांडव प्रकरण; अन्सल बंधूंना पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी सात वर्षांची शिक्षा


नवी दिल्ली – दिल्ली न्यायालयाने सोमवारी १९९७ मध्ये घडलेल्या उपहार चित्रपटगृह अग्नितांडव प्रकरणात व्यापारी सुशील अन्सल आणि गोपाल अन्सल आणि इतरांना महत्त्वपूर्ण पुराव्यांशी छेडछाड केल्याबद्दल सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर न्यायालयाने दोन्ही अन्सल बंधूंना २.२५ कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

सोमवारी उपहार आग प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या सुशील आणि गोपाल अन्सल यांना पटियाला हाऊस न्यायालयातील मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट पंकज शर्मा यांच्या न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली. सुशील आणि गोपाल अन्सल यांना न्यायालयाने २.२५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून त्यांना कोठडीत ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. याशिवाय न्यायालयाचे माजी कर्मचारी दिनेश चंद शर्मा आणि पीपी बत्रा आणि अनूप सिंग या दोघांनाही सात वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

न्यायालय अनेक विचारानंतर या निष्कर्षावर पोहोचले आहे की, पाच दोषी कठोर शिक्षेचे पात्र असल्याचेही न्यायमूर्तींनी आपल्या निर्णयात म्हटले आहे. या प्रकरणातील निकालानंतर जामिनावर बाहेर असलेल्या पाच दोषींना ताब्यात घेण्यात आले. गेल्या महिन्यात ८ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने व्यापारी सुशील आणि गोपाल अन्सल यांच्यासह त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांना उपहार आगीच्या घटनेत महत्त्वाच्या पुराव्यांशी छेडछाड केल्याबद्दल दोषी ठरवले होते. या प्रकरणी मुख्य महानगर दंडाधिकारी पंकज शर्मा यांनी न्यायालयाचे माजी कर्मचारी दिनेशचंद शर्मा आणि इतर व्यक्ती पी.पी. बत्रा आणि अनूप सिंग यांनाही दोषी ठरवले.