तृप्ती देसाईंची बिग बॉसच्या घरातून एक्झिट


‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून पाहिले जाते. सध्या ‘बिग बॉस’ मराठी ३ हा शो चांगलाच चर्चेत आहे. काल एका मोठ्या सदस्याचे बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून एलिमेशन झाले. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या बिग बॉस मराठीच्या घरातून काल बाहेर पडल्या. तृप्ती देसाई यावेळी भावूक झाल्या होत्या. विशेष म्हणजे घरातील इतर सदस्यही तृप्ती देसाईंना निरोप देतेवेळी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान यावेळी तृप्ती देसाईंनी आपल्या नव्या इनिंगची घोषणा केली.

गेल्या आठवड्यात रंगलेल्या एका टास्कदरम्यान ज्यांना ‘नॉमिनेट’ करायचे आहे अशा खेळाडूंचे फोटो व्हाईट बोर्डवर आणि इतरांचे फोटो तोरणावरील पानांवर लावण्याचे आदेश बिग बॉसने दिले होते. यावेळी कॅप्टनने चार खेळाडूंना नॉमिनेट करावे, असा आदेश बिग बॉसने दिला होता. प्रत्येक खेळाडूला या आदेशानंतर ‘नॉमिनेट’ झालेल्या चौघांपैकी फक्त दोघांचे फोटो तोरणावरील फोटोंसोबत अदलाबदली करण्याची परवानगी देण्यात आली होती. या टास्कमध्ये सर्वात शेवटी आलेल्या उत्कर्षने सोनाली घराबाहेर जावी या हेतूने फोटोंची अदलाबदली केल्यामुळे व्हाइट बोर्डवर मीनल शहा, सोनाली पाटील, जय दुधाणे आणि तृप्ती देसाई या खेळाडूंचे फोटो शिल्लक राहिले.

तर उत्कर्षने आधीच विशाल निकमला टेम्पटेशन टास्कमध्ये नॉमिनेट केले होते. यामुळे विशाल निकम, मीनल शहा, सोनाली पाटील, जय दुधाणे आणि तृप्ती देसाई हे पाच खेळाडू ‘नॉमिनेट’ झाले होते. या पाच सदस्यांमधून तृप्ती देसाई या घराबाहेर पडल्या. तृप्ती देसाई या तब्बल ५० दिवस बिग बॉसच्या घरात होत्या. महेश मांजरेकरांनी यावेळी तुमचा या घरातील प्रवास येथे संपतो, असे म्हटल्यानंतर तृप्ती देसाईंच्या डोळ्यात अश्रू तरळले. पण त्यांनीही खेळाडू वृत्ती दाखवत जनतेच्या मताचा आदर असल्याचे सांगितले. यावेळी सर्व सदस्यांना अश्रू अनावर झाले. त्यावेळी तृप्ती देसाईंनी कोणीच रडू नका, मला रडत जायचे नसल्याचा सल्ला दिला.

कोणी ना कोणी दर आठवड्याला येथून जाणार असल्यामुळे कोणीही रडू नका. सर्वजण चांगले खेळाडू आहेत, चांगले खेळा. माझ्यासाठी सर्वच समान आहेत. पुढच्या रक्षाबंधनला गिफ्ट घेऊ. आयुष्यात कधीही तुम्हाला गरज लागली, तर तृप्ती ताईंना फक्त एक फोन करायचा, असे तृप्ती देसाई बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतेवेळी म्हणाल्या. यानंतर महेश मांजेरकरांनी ५० दिवसांचा प्रवास कसा वाटला? असा प्रश्न तृप्ती देसाईंना विचारला. तृप्ती देसाई त्यावेळी म्हणाल्या, ५० दिवस हा फार मोठा प्रवास आहे. पण बिग बॉसच्या घराबद्दल बरेच गैरसमज आहेत. पण बिग बॉसचे घर हे फार छान आहे. मी सर्वांची मनं जिंकले, सर्वात मोठे आहे. मी सामाजिक कार्य करते, हे मी आधी लोकांना सांगत होते. पण आता लवकरच मी राजकारणात प्रवेश करणार असल्याचे असे तृप्ती देसाईंनी यावेळी सांगितले. त्यामुळे तृप्ती देसाई या बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर आता राजकीय क्षेत्रात प्रवेश करणार असल्यामुळे त्यांचा पुढचा प्रवास नेमका कसा असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.