भारतीय वंशाची तरुणीने पटकवला यंदाचा ‘मिस वर्ल्ड अमेरिका’ खिताब


यंदाची ‘मिस वर्ल्ड अमेरिका’ हा खिताब भारतीय वंशाची २५ वर्षीय तरुणीने पटकवला आहे. ‘मिस वर्ल्ड अमेरिका २०२१’ हा खिताब मूळची भारतीय असलेल्या श्री सैनी हिने मिळवला आहे. हा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय अमेरिकन ठरली आहे. यंदाच्या वर्षीचा मिस वर्ल्ड अमेरिकेचा मानाचा मुकुट तिला २०१७ च्या मिस वर्ल्ड डायना हेडन आणि २०१३ मिस वर्ल्ड कॅनडा यांनी त्यांच्या हाताने घालण्यात आला. लॉस एंजल्सिमध्ये ‘मिस वर्ल्ड अमेरिका २०२१’ चा हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.


अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये श्री सैनी ही राहते. त्यासोबतच ती एमडब्ल्यूए नॅशनल ब्युटी विथ पर्पज अॅम्बेसेडर देखील आहेत. वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या गरजू लोकांना श्री सैनी ही मदत करते. विशेष म्हणजे सैनी ही १२ वर्षाची असताना एका अपघातामुळे तिच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली होती. पण तरीही तिने हार मानली नाही. तिच्या प्रयत्नामुळे आज तिने हा खिताब मिळवला आहे.


श्री सैनीला मिस वर्ल्ड अमेरिका २०२१ हा खिताब जिंकल्यानंतर तिची प्रतिक्रिया विचारली असता ती म्हणाली, आता मी खूप आनंदी आणि चिंताग्रस्त देखील आहे. माझ्या भावना मी शब्दात व्यक्त करु शकत नाही. मी माझ्या पालकांना माझ्या विजयाचे श्रेय देऊ इच्छिते. विशेषत: माझी आई जिने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. तसेच या सन्मानासाठी मी मिस वर्ल्ड अमेरिकाचे देखील आभार मानते, असे म्हटले.

६ जानेवारी १९९६ रोजी लुधियानामध्ये ‘मिस वर्ल्ड अमेरिका २०२१’ हा खिताब जिंकणारी श्री सैनीचा जन्म झाला. ती पाच वर्षांची असताना तिचे पालक अमेरिकेत स्थायिक झाले. तिचे संपूर्ण शिक्षण तिने अमेरिकेत घेतले आहे. श्री सैनीने यापूर्वी अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. मिस वर्ल्ड अमेरिका २०१९ मध्येही ती सहभागी झाली होती. पण तिला काही कारणामुळे मध्येच ही स्पर्धा सोडावी लागली होती.