पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले पंढरपूर पालखी मार्गाचे भूमिपूजन


नवी दिल्ली – विविध राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते प्रकल्पांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पायाभरणी केली, त्याचबरोबर काही रस्ते आणि महामार्गाचे देखील लोकार्पण केलं. नरेंद्र मोदी पंढरपूर पालखी मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना म्हणाले, विठ्ठलाला आणि वारकऱ्यांना मी नमन करतो. देशावर कितीही संकटे आली, तरी भगवान विठ्ठलाची दिंडी अखंडपणे कायम सुरू राहिली. जगातील सर्वात प्राचीन जनयात्रा म्हणून पंढरपूरची वारी ही ओळखली जाते. आषाढी एकादशीचे विहंगम दृश्य कोणीच विसरू शकत नाही. हजारो-लाखो भाविक वारीत सहभागी होतात. शेवटी सर्व पंथ हे भागवत पंथच असल्याचे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केले.


भगवान विठ्ठलापासून मिळणाऱ्या प्रेरणेतून ‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना निर्माण झाली आहे. पंढरपूरशी माझे विशेष नाते आहे. भगवान द्वारकाधीश येथे येऊन विठ्ठल रुपात विराजमान झाले. दुसरे नाते म्हणजे माझे काशीशी नाते आहे आणि आमच्यासाठी पंढरपूर हे दक्षिण काशी असल्याचे मोदी म्हणाले. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि संत तुकारामांसारखे संत आणि नवीन ऊर्जा या भूमीने दिली. विठूमाऊलीच्या दर्शनाने डोळ्यांचे पारणे फिटते, पंढरीकडे जाणारे हे रस्ते भागवत धर्माची पताका नेणारे ठरतील, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

वारकरी चळवळीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणाऱ्या आमच्या बहिणी, देशाची स्त्री शक्ती! पंढरीची वारी संधीच्या समानतेचे प्रतीक आहे. ‘भेदाभेद अमंगळ’ हे वारकरी चळवळीचे ब्रीदवाक्य असल्याचे मोदी म्हणाले. विकासाचे रस्ते हे द्वार असते, असे आपण म्हणतो. पंढरीकडे जाणारे हे रस्ते भागवत धर्माची पताका उंच फडकवणारे ठरतील, असे मोदी म्हणाले.