आता विकी कौशल झळकणार बेअर ग्रिल्सच्या थरारक शोमध्ये


‘इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’ हा टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय असून प्रेक्षक या शोच्या प्रत्येक भागाची फार आतुरतेने वाट बघत असतात. हा डिस्कव्हरी चॅनेलवरील सर्वाधिक पाहिला जाणाऱ्या शो पैकी एक आहे. या शोमध्ये आतापर्यंत बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सहभाग घेतला आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अजय देवगण या शोमध्ये झळकणार असल्याची माहिती समोर आली होती. आता या यादीत बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचाही समावेश होणार आहे. विकी कौशलने नुकतेच हा एपिसोड कधी रिलीज होणार याची तारीख सांगितली आहे.

विकी कौशल हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या विविध चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या चित्रपटातील अभिनयामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यानंतर आता विकी कौशल हा ‘इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’ या कार्यक्रमात झळकणार आहे. त्याने नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

विकीने इंस्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, कठीण परिस्थित कसे जगायचे याचा तज्ज्ञ असलेला बिअर ग्रिल्स सोबत साहसी धाडस करण्यासाठी मी सज्ज आहे. त्याने माझ्यासाठी काय योजना आखून ठेवल्या आहे, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. येत्या १२ नोव्हेंबर रोजी ‘इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’हा भाग प्रदर्शित होईल, अशी माहिती विकीने दिली आहे. त्यामुळे आता विकीचे चाहते खुप आतुरतेने या भागाची वाट बघत आहेत. या शोचा नवीन सिझन तुम्ही डिस्कव्हरी प्लस अॅपवर प्रदर्शित होणार आहे.