नवाब मलिकांचा ‘सिलसिला’ जारी; ट्विटच्या माध्यमातून समीर वानखेडेंना सवाल


मुंबई : काल मंत्री नवाब मलिकांनी आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप केला आहे. आपले हॉटेल चालवण्यासाठी मोहित कंबोज हा शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडे त्याला मदत करतो, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते. नवाब मलिकांनी आज पुन्हा समीर वानखेडेंवर आरोपांचा ‘सिलसिला’ कायम ठेवला आहे.

आज सकाळी नवाब मलिक यांनी ट्विट करत समीर वानखेडेंना सवाल केला आहे. समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का? तिची केस पुणे न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या त्याचा पुरावा असे म्हणत ई कोर्ट सर्व्हिसेसवरील काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. नवाब मलिक यांनी म्हटले की, ती महिला कोण तिच्याशी समीर वानखेडे यांचा काय संबंध आहे, याबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यावे.


नवाब मलिक यांनी काल पत्रकार परिषद घेऊन वानखेडेंवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी म्हटले होते की, मोहित कंबोज आणि समीर वानखेडे 7 तारखेला ओशिवरा कब्रस्तान येथे भेटले होते. त्यांचे नशीब चांगले होते की त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ मिळाला नाही. वानखेडे यांना सांगू इच्छितो की मी कोणाला पाठ करून पत्रकार परिषदेसाठी पाठवत नसल्याचेही ते म्हणाले होते.

नवाब मलिक यांनी पुढे म्हटले होते की, जी केस क्रूझमध्ये बनवण्यात आली, त्यामध्ये एक पेपर रोल बॉटल मिळाली होती. असे म्हणतात की ड्रग्ज घेण्यासाठी याचा वापर होतो. याचा मालक काशिफ खान आहे. त्याला आत्तापर्यंत अटक का झाली नाही. तो आमचे मंत्री अस्लम शेख यांना येण्यासाठी खूप फोर्स करत होता. तो व्यक्ती इतर देखील सेलिब्रिटींच्या मुलांना पार्टीमध्ये येण्यासाठी फोर्स करत होता. यांचा असा तर प्लॅन नव्हता ना की मंत्र्यांना बोलवून त्यांना अशा प्रकरणात त्यांना अडकवायचे? असं मलिक यांनी म्हटले होते.

तसेच मी चुकीच्या लोकांच्या विरोधात लढत आहे. जी हजारो कोटी रुपयांची वसुली ड्रग्जच्या नावावर होत आहे त्यांच्या विरोधात मी लढत आहे. माझ्या जावयाने म्हटले आहे की, जर हे अशाप्रकारे चुकीच्या कारवाया करत असतील, तर ही लढाई अशीच सुरू ठेवा. जर मला 20 वर्षे तुरुंगात राहावे लागले, तरी हरकत नाही, पण यांना सोडू नका, असे मलिक म्हणाले होते.