जाणून घ्या सूर्यवंशी चित्रपटाच्या कमाईबाबत


दिवाळीच्या मुहूर्तावर ५ नोव्हेंबरला चित्रपटगृहांमघ्ये दिग्दर्शक रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. अक्षय कुमार, रणवीर सिंह, कतरिना कैफ आणि अजय देवगण अशी तगडी स्टार कास्ट या चित्रपटात आहे. तसेच खलनायकाच्या भूमिकेत अभिनेते गुलशन ग्रोव्हर आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. पण कोरोना काळात चित्रपटगृहांमध्ये रिलीज झालेल्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.

सूर्यवंशी चित्रपटाची दोन दिवसांची कमाई चित्रपट व्यापार विश्लेषक मनोबल विजयबालन यांनी सांगितली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात २६ कोटी ३८ लाख रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी २४ कोटी ५३ लाख रुपयांची कमाई केली आहे. एकूण ७७ कोटी २४ लाख रुपयांची कमाई चित्रपटाने केली आहे’ या आशयाचे ट्वीट मनोबल यांनी केले आहे.

तर जगभरात पहिल्याच दिवशी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने ८ कोटी १० लाख रुपयांची कमाई केली होती. अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट देशात ३,५०० स्क्रीन्सवर आणि परदेशात १३०० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. महाराष्ट्रात ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थित चित्रपटगृहे सुरु करण्यात आली आहे. तसेच या चित्रपटासोबत हॉलिवूड चित्रपट एटर्नल्स देखील रिलीज झाला होता. पण सूर्यवंशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.

‘सूर्यवंशी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट असून प्रेक्षक हा चित्रपट रिलीज होण्याची गेल्या अनेक दिवसांपासून वाट बघत होते. पण कोरोनामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख वारंवार पुढे ढकलण्यात येत होती. अखेर ५ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज करण्यात आला आणि चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.