Hyundai भारतीय बाजारपेठेत लाँच करणार आपली इलेक्ट्रिक कार Ioniq 5 EV ?


जगभरासह देशातील अनेक कंपन्या भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी सरसावल्या आहेत. त्यादृष्टीने काही कार कंपन्यांनी पावले उचलत असून इलेक्ट्रिक कार लाँचिंगसाठी प्रयत्न करत आहेत. आपली इलेक्ट्रिक कार आणण्यासाठी Hyundaiने देखील प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सुरू आहे. आपल्या भारतातील मुख्यालयात Hyundai ने Ioniq 5 EV ही इलेक्ट्रिक कार प्रदर्शनास ठेवली होती. पण, कंपनीने तिच्या लाँचिंगबाबत अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. Ioniq 5 EV ही एसयूएव्ही कार असून BEV प्लॅटफॉर्मवर कार तयार करण्यात आली आहे.

अधिक प्रशस्त असा Ioniq 5 EV या कारमधील आतील भाग असून Ioniq 5 EV ही कार डिझाइनच्या बाबतीत अधिक आकर्षक आहे. चौकोनी आकाराचे टेल-लॅम्प, समोरील बंपरवरील अथवा चाकांवरील कट्समुळे कार आकर्षक दिसत आहे. कारचा अंतर्गत भागही आकर्षक आहे. मुव्हेबल सेंटर कन्सोल, फ्लॅट फ्लोअर, इलेक्ट्रॉनिकली अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स आणि ईको-बेस्ड मटेरिअल डिझाइनचा वापर करण्यात आला आहे. त्याशिवाय, 12 इंचाचा टचस्क्रिन आणि चालकासाठी 12 इंचाचा डिस्प्लेही देण्यात आला आहे.

58 kWh अथवा 72.6 kWh मोटरसह जगभरात Ioniq 5 ही कार उपलब्ध आहे. टेस्ला मॉडेलच्या Y आणि इतर इलेक्ट्रिक कारसोबत Ioniq 5 ही कार स्पर्धा करणार आहे. जागतिक बाजारपेठेत या कारची किंमत ३७ लाखांपासून सुरू होते. जगभरात सध्या इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. आयात शुल्क माफ झाल्यास भारतीय बाजारपेठेत या कार उपलब्ध होऊ शकतील. इलेक्ट्रिक कारची किंमत अधिक असली तरी त्याची डिझाइन, श्रेणीदेखील चांगल्या दर्जाची आहे. या कारचा समावेश Hyundai Kona EV च्या वरील श्रेणीत होऊ शकतो. आता Hyundai आपली Ioniq 5 EV भारतात लाँच करणार की नाही याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.