पडळकरांच्या केसाला जरी धक्का लागला, तरी आम्ही गप्प बसणार नाही – देवेंद्र फडणवीस


पंढरपूर – काल सांगलीतील आटपाडी तालुक्यात आमदार गोपीचंद पडळकर व त्यांच्या समर्थकांवर हल्ला झाला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच, आम्ही अशा भ्याड हल्ल्यांना घाबरणारे नाही. राज्य सरकारच्या घोटाळ्याबाबत आमदार गोपीचंद पडळकर हे आवाज उठवत आहेत. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला, तरी आम्ही गप्प बसणार नाही. आमदार पडळकर यांना राज्य सरकारने तत्काळ संरक्षण द्यावे, अशी मागणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपुरात माध्यमांशी बोलताना केली.

तसेच, सर्वांना बोलण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. परंतु राज्य सरकार भाजप कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारच्या अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाहीत. हल्लेखोरांवर तत्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी, असे फडणवीस यांनी यावेळी म्हटले. त्यापूर्वी त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शनही घेतले. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर ज्याप्रकारे भ्याड हल्ले होत आहेत. सरकारच्या विरोधात बोलाल तर आम्ही तुमच्यावर हल्ले करू ही मानसिकता चुकीची आहे. विरोधी पक्षाचे काम सरकारच्या विरुद्ध बोलणे आहे. सरकारचे घोटाळे बाहेर काढणे आहे. त्यांना लक्ष्य केले जात आहे, सरकारने विशेषता मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्यांना सुरक्षा द्यावी. त्यांच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही सहन करणार नाही आणि याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल. त्यामुळे सरकारने सुरक्षा दिली पाहिजे. आमच्या काळात अशाचप्रकारची धमकी ज्यावेळी जितेंद्र आव्हाड यांना आली होती आणि शरद पवार मला बोलले होते. ते कुठल्या पक्षाचे आहेत किंवा आमच्या विरोधात काय बोलतात याचा विचार न करता. तत्काळ त्यांना मी सुरक्षा दिली होती. सरकारचे हे काम असते, त्यामुळे गोपीचंद पडळकरांना सुरक्षा दिलीच पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.