भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात लढवणार निवडणूक


लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसंदर्भात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी मोठी घोषणा केली आहे. ज्या मतदारसंघातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निवडणूक लढवतील, त्याच जागेवरून आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यापूर्वी त्यांनी २०१९ मध्ये वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली होती. पण, ऐनवेळी त्यांनी माघार घेतली होती.

पंतप्रधानांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतला, पण त्यावेळी माझ्याकडे माझा पक्ष नव्हता, त्यामुळे मी तसे केले नाही. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी मला विरोधी मतांचे विभाजन करण्याऐवजी मी त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देणे चांगले राहील, असे सांगितल्याचे चंद्रशेखर आझाद एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

तसेच उत्तर प्रदेशमधील प्रत्येक जागा त्यांचा भीम आर्मी हा पक्ष लढवेल, असेही त्यांनी सांगितले. निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, पक्षाच्या मंडळाचे हे निर्णय आहेत. तेथे असलेली समिती निर्णय घेईल. जर तुम्ही माझ्या मनापासून विचाराल, तर मी सांगेन की लोकशाही आहे, मला माझ्या पक्षात माझे मत मांडण्याचा अधिकार आहे. जर पक्षाने मला संधी दिली, तर मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ज्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत, त्या ठिकाणाहून निवडणूक लढवीन. त्याच्या विरोधात मी निवडणूक लढवणार आहे.

मुख्यमंत्री योगी यांच्या विरोधात मी निवडणूक लढवणार आहे, कारण गेल्या साडेचार वर्षात त्यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेला खूप त्रास दिला आहे. अशा निर्दयी मुख्यमंत्र्याच्या विरोधात मी निवडणूक लढवणार, त्यांना सभागृहात येऊ देणार नाही, असा माझा विश्वास आहे. माझ्यासाठी विधानसभेत जाणे आवश्यक नाही, पण योगींना थांबवणे महत्त्वाचे आहे. सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची पक्षाची तयारी सुरू असल्याचेही आझाद म्हणाले.