अयोध्येतून निघाली रामायण एक्स्प्रेस 

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या भक्तांसाठी रामायण एक्प्रेसचा प्रवास सुरु झाला आहे. दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून १५६ प्रवाशांना घेऊन रविवारी आयआसीटीसीची ही गाडी अयोध्येसाठी रवाना झाली. यामुळे धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. आयआरसी टीसीने ‘देखो अपना देश’ मोहिमेअंतर्गत या डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेनला हिरवा कंदील दाखविला. यामुळे राम भक्त, प्रभू रामचंद्राशी संबंधित सर्व महत्वाच्या स्थळांना भेट देऊ शकणार आहेत.

ही गाडी सोमवारी अयोध्येत पोहोचेल आणि तेथून रामायण यात्रा सुरु होईल. अयोध्येपासून रस्ता मार्गाने प्रवाशांना नंदीग्राम, सीतामढी ते नेपाळ मधील जनकपुर येथे नेले जाणार आहे.नंतर पुन्हा रेल्वेने द, भारतातील राम स्थळांचे दर्शन घडविले जाणार आहे. आधुनिक सुविधांनी युक्त एसी प्रवासी ट्रेन प्रथमच धार्मिक यात्रेसाठी रवाना झाली त्यावेळी स्टेशनवर रामाची गीते गायली गेली, रामायणातील महत्वाच्या पात्रांच्या वेशभूषेत कलाकार हजर होते.

या गाडीचे डिझाईन खास प्रकारे केले गेले असून त्यात साईड बर्थच्या जागी आरामदायी टेबल खुर्च्या आहेत. हॉटेलप्रमाणे वेगळे शौचालय आणि स्नानाची व्यवस्था आहे. दोन डायनिग कोच असून प्रवाशांना गरमागरम जेवण, खाद्यपदार्थ पुरविले जाणार आहेत. पहिले स्टेशन अयोध्या, त्यानंतर सीतामढी, नेपाळ मधील जनकपुर तेथून काशी, प्रयाग, चित्रकुट, नाशिक, त्रंबकेश्वर, पंचवटी, हम्पी आणि शेवटचे स्थानक रामेश्वर असा हा प्रवास आहे. १७ दिवसात ७५०० किमी चा प्रवास रस्ता आणि रेल्वेने केला जाणार असून प्रवाशांना फुट मसाजर, लायब्ररी, इलेक्ट्रिक लॉकर, टुरिस्ट गाईड अश्या सुविधा मिळतील.सुरक्षा गार्ड आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले आहेत. कोविड १९ प्रोटोकॉल नुसार मास्क, ग्लव्हज, सॅनिटायझर दिले जाणार आहेत. आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

प्रथम श्रेणी साठी १,०२,०९५ रुपये तर द्वितीय श्रेणीसठी ८२,९५० रुपये शुल्क आकारले जात आहे. भाविकांच्या मागणी नुसार अशी दुसरी ट्रेन १२ डिसेम्बर रोजी रवाना होणार आहे. १८ वर्षावरील आणि लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना या प्रवासाची परवानगी दिली गेली आहे.