ही आहे पृथ्वीवर बनविली गेलेली सर्वात महाग वस्तू
जगभरात रोजच काही ना काही नवीन बनविले जात असते. त्यात महागड्या वस्तूंची चर्चा अधिक होते. महागड्या इमारती, रिसोर्ट, हॉटेल्स, दागिने म्हणजे अगदी पिनेपासून विमानापर्यंत आणि अगदी छोट्या घरापासून १५० मजली इमारतीपर्यंत सगळ्या महागड्या वस्तू लोकांच्या कुतुहलाचे विषय असतात. पृथ्वीवर बनविली गेलेली सर्वात महाग वस्तू मात्र या पैकी कोणतीही नाही. मुळात ती पृथ्वीवर बनविली गेली असली तरी ती पृथ्वीवर नाही. ही वस्तू म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर ते आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक. म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन.
सीएनबीसीच्या रिपोर्ट नुसार हे स्पेस स्थानक ही जगातली सर्वात महाग वस्तू असून तिची किंमत १५० अब्ज डॉलर्स आहे. म्हणजे १५ हजार कोटी डॉलर्स. रुपयात हि आकडेमोड कॅल्क्युलेटर सुद्धा करू शकत नाही. अमेरिकन स्पेस एजन्सी नासा दरवषी ४०० कोटी डॉलर्स हा स्टेशनच्या देखभालीसाठी खर्च करते.
हे अंतराळ स्थानक बनविणे म्हणजे त्याचा सेटअप व सिस्टीम बनविणे इतके कठीण होते कि त्यासाठी अनेक देशांना योगदान द्यावे लागले आहे. अमेरिका, रशिया, युरोप, कॅनडा व जपान या देशांनी त्यासाठी फंडिंग केले आहे. या स्पेस स्टेशनवर प्रयोगशाळा आणि अन्य अत्याधुनिक सुविधा असून त्यासाठीच अधिक पैसा खर्च झाला आहे. नोव्हेंबर २००० पासून विविध देशांचे अंतराळवीर या स्टेशनवर काही प्रयोग करण्यासाठी, अन्य ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी जात आहेत. येथे भाजीपाला, फळे, फुले पिकविण्याचे प्रयोग सुद्धा यशस्वी झाले आहेत. मात्र आता या अंतराळस्थानकाचे आयुष्य संपत आले असून नवे अंतराळस्थानक बनविण्याचे काम सुरु आहे. चीन आणि रशिया स्वतःची अंतराळस्थानके अंतराळात बनवीत आहेत.