स्पेसएक्स रॉकेटचे टॉयलेट तुटले, डायपर घालून परतणार अंतराळवीर

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून चार अंतरावीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी गेलेल्या एलोन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीच्या रॉकेटचे स्वच्छतागृह (टॉयलेट) तुटल्यामुळे हे अंतराळवीर डायपर घालून आठ तासांचा प्रवास करणार आहेत. नासाचे अंतराळवीर मेगन मॅकआर्थर यांनी सांगितले, शुक्रवार पासून येथे भयानक परिस्थिती आहे तरी आम्ही त्यावर मात करू. पृथ्वीवर परतताना आम्हा चौघा अंतराळवीरांना डायपर घालूनच आठ तासांचा प्रवास करावा लागणार आहे. ही कॅप्सूल अंतराळात २१० दिवस राहू शकते पण त्यातील २०० दिवस अगोदरच संपले आहेत.

अमेरिका, फ्रांस, जपान या देशांच्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आणण्यासाठी रविवारी अंतराळस्थानकातून रवाना होणारी ही कॅप्सूल सोमवारी मेक्सिकोच्या समुद्रात उतरणार होती. पण हवेचा वेग प्रचंड असल्याने स्पेस एक्सने हे सहा महिन्यांचे मिशन सोमवार दुपार पर्यंत लांबविले आहे. आता हा प्रवास आठ तासांचा असेल. म्हणजे पहिल्या प्रवासाच्या अर्धा असेल असे समजते.

अंतराळातून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिल्या गेलेल्या माहितीनुसार स्पेस लाईट समोर अनेक आव्हाने असून त्यातील टॉयलेट तुटणे हेही एक आहे. मेगन यांनी दिलेल्या माहितीनुसार गेले सहा महिने तणावपूर्ण होते. आंतराळस्थानकावरील पॉवर ग्रीड अपग्रेड करण्यासाठी स्पेस वॉकची एक सिरीज पार पाडली गेली आहे. शिवाय रशियाने याच काळात येथे एका चित्रपटाचे शुटींग केले आहे.