सिंगापूर मध्ये करोनाबाधित मुलांमध्ये एमआयएस सिंड्रोमचे प्रमाण वाढले

सिंगापूर मध्ये करोना केसेस वाढत चालल्या असतानाच लहान मुलांमध्ये एमआयएस- सी म्हणजे मल्टी सिस्टीम इन्फ्लमेंटरी सिंड्रोमच्या प्रमाणात वेगाने वाढ होऊ लागल्याचे दिसून आले आहे. कोविड १९ संसर्ग झालेल्या लहान मुलांमध्ये हा विकार वेगाने वाढत असल्याचे सिंगापूर आरोग्य मंत्रालयाकडून सांगितले गेले आहे. हा रोग नाही पण कोविड १९ ची लागण झालेल्या लहान मुलांमध्ये या विकारामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. कोविड १९ मधून बरे झाल्यावर अनेक आठवड्यांनी सुद्धा हा विकार होऊ शकतो. यात हृदय, यकृत, डोळे, त्वचा, किडनी, रक्तवाहिन्या, मेंदू अश्या अवयवांना सूज येते आणि अनेकदा मुलांची स्थिती गंभीर बनते.

सिंगापूर आरोग्य मंत्रालयाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार सरकार कोविड १९ नियंत्रणासाठी कसून उपाययोजना करत आहे. शनिवारी देशात ३०३५ नवे करोना बाधित सापडले असून १२ मृत्यू झाले आहेत. कोविड १९ संक्रमित ८ हजार लहान मुलांमध्ये एमआयएस सिंद्रोम आढळला असून त्यातील एकाला व्हेंटीलेटर वर ठेवावे लागले आहे. गेल्या वर्षी केल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय समीक्षा अध्ययनात करोना संक्रमित मुलांमध्ये ०.१४ टक्के हा सिंड्रोम आढळला आहे. सिंगापूर मध्ये करोना मुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या सुद्धा वाढते आहे.

परिणामी देशात पुन्हा एकादा प्रतिबंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेतलेले नाही त्यांना विना वेतन सुट्टीवर पाठविले जाणार असल्याचेही समजते. २३ ऑक्टोबर मध्ये मंत्रालयाने केलेल्या घोषणेनुसार कोविड १९ लसीचे दोन्ही डोस घेतलेले किंवा करोना संक्रमणातून बरे झाल्यावर २७० दिवस लोटले असतील तर ते कर्मचारी १ जानेवारी २०२२ पासून कार्यालयात जाऊन काम करू शकणार आहेत.