न्यूझीलंड मध्ये इच्छामृत्यू कायद्याला मान्यता
न्यूझीलंड मध्ये इच्छा मृत्यू कायद्याला मान्यता दिली गेली असून हा कायदा काही अटींवर लागू केला गेला आहे. असाध्य आजार किंवा उपचार सुरु असताना सुद्धा जे सहा महिन्यापेक्षा अधिक जगू शकणार नाहीत त्याच्यासाठी हा कायदा लागू केला गेला आहे. यापूर्वी अमेरिका, स्वित्झर्लंड, नेदरलंड, स्पेन,बेल्जियम, लाग्झेंबर्ग, कॅनडा, कोलंबिया, ऑस्ट्रेलिया आणि फ्रांसने इच्छा मृत्यू कायद्याला मान्यता दिली आहे मात्र या सर्व देशांनी त्यासाठी वेगवेगळे नियम आणि अटी लागू केल्या आहेत.
न्यूझीलंड मध्ये एखाद्याला इच्छा मृत्यू हवा असेल तर किमान दोन डॉक्टरांची सहमती आवश्यक आहे. या कायद्याबाबत दीर्घ काळ वादविवाद सुरु होते. त्यानंतर जनमत घेतले गेले तेव्हा ६५ टक्के नागरिकांनी कायद्याच्या बाजूने कौल दिला असे समजते. अर्थात अजूनही मोठा वर्ग या कायद्याच्या विरोधात आहे. इच्छा मृत्यूमुळे समाज जीवनाची मुल्ये आणि सन्मान कमी होईल असे काही जणांचे म्हणणे आहे. कमजोर लोक, विकलांग लोकांच्या अंतिम काळात त्यांची देखभाल करण्याबाबत निष्काळजीपणा येऊ शकतो असाही आक्षेप घेतला गेला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दरवर्षी ९५० नागरिक इच्छा मरणासाठी अर्ज करू शकतील आणि त्यातील ३५० जणांना इच्छा मृत्यूची परवानगी दिली जाईल आणि त्यांना वेदनामय आयुष्यातून मुक्त केले जाईल असे म्हटले आहे.