आपल्या रोजच्या स्वयंपाकात वापरला जाणारा हिंग जेवणाला विशेष स्वाद देतोच पण त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. कडकडून भूक लागली असताना हिंगाच्या फोडणीचा खमंग वास घरात दरवळला की कधी एकदा पानावर बसतो असे होते. हा हिंग जेवणाला केवळ स्वाद देत नाही तर खाल्लेले अन्न व्यवस्थित पचावे यासाठीही महत्वाची भूमिका बजावत असतो.
चिमुटभर हिंगाचे ढीगभर फायदे
ज्यांना पोटात गॅसेस होतात त्यांनी ताकात एक चिमुटभर हिंग घालून प्यायले तर हा त्रास कमी होतो. ताक नसेल तर गरम पाण्यात हिंग पूड घालून प्यायल्यानेही हाच फायदा मिळतो. हिस्टेरिया होणाऱ्या व्यक्तींना हिंग नुसता हुंगवला तरी त्या शांत होतात. हिंग, सुंठ आणि कापूर यांचा लेप कपाळावर दिल्यास डोकेदुखी कमी होते.
अनेक भारतीय पदार्थात हिंग वापरला जातो. सांबर, आमटी, बहुतेक सर्व भाज्या, चटण्या, मसाले यात हिंग वापरला जातो. हिंग सूज कमी करणारा आहे, तसेच कृमींचा नाश करणारा, बॅक्टेरीयांचा नाश करणारा आहे. हिंग सारक आहे त्यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते. हिंग मेंदूला चेतना देणारा आहे तसेच झोप आणणारा ही आहे. तो रक्त पातळ ठेवतो त्यामुळे रक्तात गुठळी होण्याचा धोका राहत नाही.
दात दुखत असतील तर हिंग पाण्यात घालून त्याच्या गुळण्या कराव्यात किंवा हिंग, लिंबू रस एकत्र करून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. श्वास नलिकेतील संसर्ग कमी करण्यासाठी हिंग उपयुक्त आहे. हिंग, मध आणि आले यांचे मिश्रण कोरडा खोकला कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. महिलांना मासिक पाळीचा त्रास होत असेल, पायात गोळे येणे, कंबर दुखी यात हिंग उपयुक्त आहे. तो त्वचेवर थेट लावता येतो आणि त्वचाविकारात हिंग खूपच उपयोगी आहे. स्वाइन फ्ल्यू वरील औषधात हिंग वापरला जातो. कॅन्सरला प्रतिबंध करणारा म्हणूनही हिंग उपयोगी आहे.