काल दिवसभरात देशात १०,९२९ कोरोनाबाधितांची नोंद, तर ३९२ रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – काल दिवसभरात देशात १० हजार ९२९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर ३९२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर काल दिवसभरात १२ हजार ५०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ४६ हजार ९५० एवढी झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या ४ लाख ६० हजार २६५ वर पोहचली आहे. याच पार्श्वभूमीवर वेगाने कोरोना लसीकरण करण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ आग्रही आहेत. सध्या देशभरात १०७ कोटी ९२ लाख १९ हजार ५४६ डोसचे लसीकरण झाले आहे.

देशातील दररोजच्या कोरोनाबाधितांची संख्या मागील सलग २९ दिवसांपासून २० हजारच्या खाली आहे. याशिवाय मागील १३२ दिवसांपासून ५० हजार रुग्णसंख्येच्या खाली कोरोनाबाधितांची नोंद आहे. दररोजच्या कोरोना रुग्ण वाढीचा दर १.३५ एवढा आहे. तर मागील ३३ दिवसांपासून हा दर २ टक्क्यांच्या खाली आहे. साप्ताहिक कोरोना वाढीचा दर १.२७ एवढा नोंदवला गेला आहे. तर मागील ४२ दिवसांपासून साप्ताहिक कोरोना वाढीचा दर २ टक्क्यांच्या खाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.