कोरोनाच्या नवीन विषाणूचा युरोपपेक्षा दक्षिण आशियाई देशांना धोका अधिक


नवी दिल्ली – दक्षिण आशियात राहणाऱ्या लोकांमध्ये अधिक घातक विषाणू आढळून आल्याचा दावा कोरोनासंदर्भातील एका संशोधनामध्ये शास्त्रज्ञांनी केला आहे. फुफ्फुसे या विषाणूमुळे निकामी होण्याची आणि कोरोनामुळे रुग्ण मरण पावण्याची शक्यता दुप्पटीने वाढण्याची शक्यता अधिक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. ऑक्सफर्ड विद्यापिठाच्या नेचर जेनेटिक्स या जर्नलमध्ये गुरुवारी म्हणजेच ४ नोव्हेंबर रोजी हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

एलझेडटीएफएल वन असे नाव नवीन प्रकारच्या या जीनला म्हणजेच जनुकीय रचनेला देण्यात आले आहे. या जीनमुळे फुफ्फुसांवर परिणाम होतो. आतापर्यंतच्या संशोधनांमध्ये आढळून आलेला हा सर्वात मोठा परिणाम करणारा जीन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दक्षिण आशियातील ६० टक्के लोकांमध्ये हा जनुकीय बदल आढळून येतो, तर युरोपियन देशांमधील केवळ १५ टक्के लोकांनामध्ये तो आढळतो, असे संशोधक म्हणाले. भारतीय उपखंडामध्ये कोरोनाचा एवढा परिणाम का झाला यासंदर्भातील स्पष्टीकरण देणारे हे संशोधन असल्याचे सांगण्यात येत आहे.

संशोधनानुसार या नवीन जीनमुळे संसर्ग झाल्यानंतर फुफ्फुसांवर परिणाम होऊ न देणाऱ्या यंत्रणेला काम करण्यात अडथळा निर्माण होतो. जेव्हा हे जीन कोरोनाचा संसर्गासाठी जबाबदार असलेल्या सार्क कोव्ही टू या विषाणूसोबत एकत्र येतात, तेव्हा ते अधिक घातक ठरतात आणि ते सहज एखाद्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारशक्तीवर मात करुन त्याला बाधित करु शकतात, असे संशोधक म्हणतात. तसेच एलझेडटीएफ वनचा अंश असणाऱ्या लोकांना लसीकरणाचा फार फायदा होतो, असा दावाही संशोधनात करण्यात आला आहे.

यापूर्वी वेगवेगळ्या वंशाच्या लोकांवर सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे कोरोनाचा वेगवेगळा परिणाम झाल्याचे म्हटले जात होते, असे मत फ्रॅन्सीस फ्लिंटर यांनी व्यक्त केले आहे. फ्लिंटर हे गाइज् अॅण्ड सेंट थॉमस एनएचएश फाऊंडेशन ट्रस्ट युकेमध्ये या विषयावर संशोधन करणारे प्राध्यापक आहेत. कोरोनाचा परिणाम हा केवळ सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर अवलंबून नसून इतर गोष्टीही कारणीभूत असल्याचे आता स्पष्ट झाले असून अजून संशोधन करणे गरजेचे आहे. कोरोनाचा संसर्ग होऊन त्याचा श्वसन संस्थेवर परिणाम करण्यासाठी एलझेडटीएफएल वन जीन कारणीभूत ठरतो.