कॉर्डेलिया प्रकरणाचे मास्टरमाइंड सुनील पाटील! मोहीत कंबोज यांचा खळबळजनक दावा!


मुंबई – आर्यन खान याला जामीन मिळाल्यानंतर हे प्रकरण काहीसे शांत होत असल्याचे दिसत असतानाच भाजप नेते मोहीत कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक दावा केला आहे. आर्यन खान प्रकरण, कॉर्डेलिया क्रूजवर टाकलेला छापा आणि त्यानंतरची कारवाई या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाईंड सुनील पाटील नावाची व्यक्ती असल्याचा दावा मोहीत कंबोज यांनी केल्यामुळे या प्रकरणावरून राज्याच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ मोहीत कंबोज यांनी सुनील पाटील आणि सॅम डिसूजा यांच्यात झालेल्या व्हॉट्सअॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट देखील पत्रकार परिषदेत ठेवले.

सुनील पाटील या सर्व प्रकरणामागचे मास्टर माइंड असल्याचा दावा मोहीत कंबोज यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद घेऊन केला आहे. देशभरात के. पी. गोसावीचा फोटो चर्चेत राहिला. शाहरुखच्या मुलासोबत सेल्फी घेताना किरण गोसावी दिसला. दुसऱ्या फोटोमध्ये किरण गोसावी भाजपचा कार्यकर्ता असून आर्यन खानला खेचून एनसीबीमध्ये घेऊन जात असल्याचे दिसले. पण या सगळ्या प्रकरणामागचा मास्टरमाईंड सुनील पाटील असल्याचे मोहीत कंबोज म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील पाटील हे संस्थापक सदस्य आहेत. ते धुळ्याचे आहेत. त्यांचे २० वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षासोबत संबंध राहिले आहेत. फक्त संबंधच नाही, तर नुकतेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांचे ते चांगले मित्र आहेत. राज्यात राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व नेते आणि मंत्र्यांचे त्यांच्याशी घरगुती संबंध आहेत. अनिल देशमुखांवर ईडीची सुरू असलेल्या कारवाईत सुनील पाटील यांची भूमिका आहे. राज्याच्या गृहविभागात अधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी सुनील पाटील पैसे घेत होते. सुनील पाटील राज्यात गृहविभागात बदलीचे रॅकेट चालवत होते. १९९९ ते २०१४पर्यंत सुनील पाटील यांचे रॅकेट अॅक्टिव्ह होते. २०१४मध्ये सरकार बदलल्यानंतर ते अंडरग्राउंड झाले. २०१९नंतर सुनील पाटील पुन्हा महाराष्ट्रात, मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलांमध्ये बदल्यांचे रॅकेट चालवत आहेत. यात महाविकासआघाडीच्या अनेक मंत्र्यांचे त्यांच्याशी संबंध असल्याचे देखील कंबोज म्हणाले.

सुनील पाटील यांची आर्यन खान प्रकरणात नेमकी काय भूमिका आहे, याविषयी सविस्तर माहिती मोहीत कंबोज यांनी दिली आहे. सॅम डिसूझा नावाच्या माणसाचा उल्लेख नवाब मलिक, संजय राऊत, प्रभाकर सईलच्या प्रतिज्ञापत्रातही आहे. सुनील पाटील यांनी सॅम डिसूजाला १ तारखेला व्हॉट्सअॅप मेसेज केला. नंतर व्हॉट्सअॅप कॉल केला. त्यांनी सांगितले माझ्याकडे २७ लोकांची लीड आहे. क्रूजवर ड्रग्ज पार्टी होणार आहे. एनसीबीच्या कुठल्यातरी अधिकाऱ्याशी बोलणे करून दे. सॅम डिसुजाने एनसीबीमधील एक अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्याशी बोलणे केले. मग सॅम डिसूजाने सुनील पाटील यांच्याशी बोलणे केल्याचे मोहीत कंबोज म्हणाले.

सुनील पाटील यांनी २ ऑक्टोबरला सॅम डिसूजाला सांगितले माझ्या माणसाला तुम्ही एनसीबीच्या एका व्यक्तीची भेट घालून द्या. माझ्याकडे खूप सारी माहिती आहे. सॅमने कोण माणूस आहे? असं विचारले असता सुनील पाटील यांनी किरण गोसावी असे नाव सांगितले. सुनील पाटील यांनीच सॅम डिसूजाला किरण गोसावीचा नंबर दिला आणि पुढील कारवाई करण्यासाठी किरण गोसावी मदत करेल असे सांगितल्याचा दावा मोहीत कंबोज यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.