तर मला एकांतात भेटा अशी टिप्पणी लैंगिक संबंधाची मागणी करणारी नाही – उच्च न्यायालय


रायपूर – एका सहाय्यक प्राध्यापकाविरोधातील एफआयआर रद्द करत असताना छत्तीसगढ उच्च न्यायालयाने एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली आहे. मॅडम, सुट्टी हवी असेल तर मला एकांतात भेटा अशी टिप्पणी लैंगिक संबंधांची मागणी करणारी नसल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

या प्रकरणातील निर्णय देताना न्यायालयाने म्हटले आहे की, फिर्यादीने कलम ३५४ अ अंतर्गत आरोप लावले आहेत. पण, फिर्यादी आणि आरोपीमध्ये कोणत्याही प्रकारचा शारिरीक संपर्क नाही झाला किंवा लैंगिक संबंधाची मागणी किंवा आवाहन करण्यात आलेली नाही. त्यामुळे अशी टिप्पणी करणे हा अपराध मानला जाऊ शकत नाही.

न्यायमूर्ती नरेंद्र कुमार व्यास या प्रकरणात म्हणाले, आपण हे प्रकरण जर पाहिले, तर फिर्यादीचे म्हणणे आहे की आरोपी त्यांना म्हणाला, मॅडम, तुम्हाला सुट्टी हवी असेल. तर मला एकांतात भेटा. पण यावरुन हे अनुमान लावता येणार नाही की ही टिप्पणी लैंगिक संबंधाची मागणी करणारी असल्यामुळे आरोपीवर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करता येणार नाही.