राणेंच्या दादरा नगर हवेलीच्या विजयावरील टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर


मुंबई – दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीतील विजयावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय असल्याचा खोचक टोला राणेंनी शिवसेनेला लगावला होता. संजय राऊत यांनी यावर जे सांगतात दादरा नगर हवेलीच्या नवनिर्वाचित खासदार कलाबेन डेलकर शिवसेनेच्या नाहीत, त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाची वेबसाईट पाहावी, असा सल्ला दिला आहे. तसेच या वेबसाईटवरील एक स्क्रिनशॉट देखील आपल्या ट्वीटसोबत शेअर केला आहे. यात कलाबेन डेलकर यांचा पक्ष म्हणून शिवसेनेचा स्पष्ट उल्लेख आहे.

संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये, सबसे अलग हुं.. पर गलत नही! जे सांगतात दादरा नगर हवेलीच्या नवनिर्वाचित खासदार कलाबेन डेलकर शिवसेनेच्या नाहीत, त्यांचा हा जळफळाट आहे. जरा ही भारतीय निवडणूक आयोगाची वेबसाईट पहा. शिवसेना जिंदाबाद!, असे म्हटले आहे.


दादरा-नगर हवेलीतील संजय राऊतांना देखील नारायण राणेंनी टोला लगावला. संजय राऊतांचा अग्रलेख मी गेले दोन दिवस वाचला. देशात विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. यात एक जागा दादरा-नगर हवेलीची अपक्ष उमेदवाराने जिंकली. शिवसेनेने डंका सुरू केला की राज्याच्या बाहेर आम्ही जिंकलो. मुद्दाम त्या उमेदवाराची निशाणी मी मागवून घेतली. ती फलंदाज बॅट घेऊन उभा असल्याची आहे. पण दुसऱ्यांच्या मुलाचे बारसे करायची सवय शिवसेनेला आहेच.

कमला डेलकर निवडून आल्या. त्याबद्दल शिवसेना आम्हाला यश मिळाले, आता दिल्ली काबीज करणार म्हणत आहेत. लिखाण करताना त्या व्यक्तीला भान नसेल. रात्री जे करायचे ते दिवसा केल्यामुळे संजय राऊतांबाबत असा परिणाम होत आहे का हे मला माहीत नाही, असे नारायण राणे म्हणाले.

शिवसेना आम्हाला यश मिळाले, आता दिल्ली काबीज करणार म्हणते. ३०३ जागांसह मोदींचे सरकार बहुमतात आहे. तुम्ही एका जागेनिशी धडक मारणार म्हणता. पण धडक कशी असते हे तुम्हाला माहिती नाही. दिल्लीला धडक मारायला आलात तर डोके जागेवर राहणार नाही. तिथे संजय राऊत डोक्याविना दिसतील, अशा शब्दांत नारायण राणे यांनी राऊतांवर टीका केली.