आर्यन प्रकरणातून समीर वानखेडेंना वगळण्यात आलेले नाही – क्रांती रेडकर


मुंबई – अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन याला मुंबईत क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक करणारे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून अखेर या प्रकरणासह राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही तपास काढून घेण्यात आला आहे. या प्रकरणांचा तपास आता वरिष्ठ अधिकारी संजय सिंह करणार आहेत. पण वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणावरुन हटवण्यात आल्याची चर्चा या बातमीनंतर सोशल मीडियावर रंगू लागली आहे. वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने याचसंदर्भात आता खुलासा करत चुकीच्या माहितीला बळी पडू नका, असे म्हणत एनसीबीने जारी केलेले पत्रकच ट्विटरवरुन शेअर केले आहे. समीर यांना हटवण्यात आले नसल्याचा दावा क्रांतीने केला आहे.


शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास क्रांतीने ट्विटरवरुन एनसीबीने ५ नोव्हेंबर २०२१ रोजी जारी केलेले प्रसिद्धीपत्रक शेअर केले आहे. अफवांना बळी पडू नका. हे पाहा एनसीबीने जारी केलेले अधिकृत पत्रक, असं म्हणत या पत्रकाचा फोटो शेअर केला आहे. या पत्रकामधील काही ओळखी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा अधिकाऱ्यांना त्यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या सध्याच्या प्रकरणावरुन हटवण्यात आलेले नाही. ते अधिकारी ऑप्रेशन ब्रँचला तपासात सहकार्य करतील, जोपर्यंत पुढील काही आदेश दिला जात नाही, असे या पत्रकात नमूद करण्यात आल्याचे क्रांतीने दर्शवले आहे. तसेच या पत्रकामध्ये संपूर्ण देशात एनसीबी एक संस्था म्हणून काम करत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.