सचिन वाझेला खंडणी प्रकरणात १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी!


मुंबई – न्यायालयाने खंडणीच्या प्रकरणात मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला आता १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेकडून या अगोदर याप्रकरणी जेव्हा १० दिवसांची कोठडीची मागणी करण्यात आली होती, तेव्हा न्यायालयाने सचिन वाझेला ६ नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी सुनावली होती.

तर, सचिन वाझेने गुन्हे गुप्तवार्ता विभागात (सीआययू) कार्यरत असताना तपास सुरू केलेली बहुसंख्य प्रकरणे संशयास्पद असल्याचे पोलीस विभागाच्या अंतर्गत तपासणीत निष्पन्न झाले आहे. अशा सुमारे २५ प्रकरणांचा तपास बंद करण्यात आला आहे. ‘सीआययू’चे प्रभारी असताना वाझे तपास करत असलेले १५ गुन्ह्योही इतर विभागांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.

बडतर्फ केलेले मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी तळोजा कारागृहातून तात्पुरती बदली करून नजरकैदेत राहण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) वाझेंना नजरकैदेत ठेवण्यास विरोध केला आहे. वाझे हा नजकैदेत ठेवल्यास पळून जाऊ शकतो आणि खटल्यातील साक्षीदारांसदर्भात छेडछाड करू शकतो, अशी भीती एनआयएने न्यायालयात व्यक्त केली आहे. एनआयएने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की सचिन वाझेंवर व्यापारी मनसुख हिरेनच्या हत्येचा कट आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यासह गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे, त्यामुळे त्यांना नजरकैदेत राहण्याची परवानगी देण्यात येऊ नये.