राहुलकडून आथिया शेट्टीसोबतच्या अफेअरची कबुली


अखेर आथिया शेट्टीबरोबरच्या आपल्या नात्यावर भारताचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज के. एल. राहुलने कबुली दिली आहे. आथिया आणि क्रिकेटपटू के. एल राहुल यांच्या नात्यांबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरु होती. अनेक ठिकाणी दोघांना स्पॉटही करण्यात आले होते. दोघांकडून आपल्या नात्यांवर मौन बाळगण्यात आले होते. पण, स्कॉटलँड विरुद्ध सामन्यानंतर आथिया शेट्टीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राहुलने आपल्या नात्याचा खुलासा केला आहे. दोघांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत राहुलने आपल्या नात्यावर खुलासा केला आहे.


विश्वचषक स्पर्धेतील स्कॉलँडविरोधातील सामन्यात आथिया शेट्टी स्टेडिअममध्ये उपस्थित होती. अवघ्या 18 चेंडूत राहुलने धमाकेदार अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. राहुलच्या मैदानावरील प्रत्येक फटक्यानंतर आथिया शेट्टी चिअर करताना दिसत होती. पाच नोव्हेंबर रोजी आथियाचा वाढदिवस असतो. त्याचे औचित्य साधत राहुलने सामन्यानंतर शुभेच्छा देताना आपले नाते जग जाहीर केले आहे. राहुलने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अथियासोबतचा फोटो पोस्ट केला. त्याने आपल्या कॅप्शनमध्ये अथियासोबतचे नाते जगासमोर आणले. यावेळी त्याने कॅप्शनमध्ये ‘Happy birthday my ❤’ असे लिहित अथियासोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची अथिया मुलगी आहे. 2015 मध्ये हिरो चित्रपटातून आथियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. राहुल आणि आथिया यांची एका जाहिरातीदरम्यान भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर लंडन येथे त्यांना एकत्र पाहिले गेले. यावेळच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.